Mumbai Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. लोकसभा निवडणुका लवकर होणार असल्याचे गृहीत धरून त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इंडिया आघाडीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी समन्वय समितीची पाहिली बैठक १३ सप्टेंबरला शरद पवार यांच्या दिल्लीतील ७ जनपथ या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीस समन्वय समितीमधील १३ सदस्य उपस्थित राहणार आहेत.
तसेच, यापुढे इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठका होणार नाहीत. आता इंडिया आघाडीत नेमलेल्या समितीच्या बैठका यापुढील काळात होणार आहेत. या पूर्वी इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटण्याला तर दुसरी बैठक बेंगळुरूला झाली. त्यांनतर तिसरी बैठक मुंबईत झाली. यानंतर येत्या काळात मोठ्या बैठक होणार नाहीत, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
१३ सप्टेंबरला शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. या बैठकीत आगामी काळात इंडिया आघाडीची पुढील सभा, रॅली व जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पुढील काळात मोठ्या बैठका ऐवजी नेमण्यात आलेल्या सर्व समितीच्या नियमित बैठका होणार आहेत.
'इंडिया' नाव रद्द करून 'भारत' हे नाव कायमस्वरूपी करण्यासाठी मोदी सरकारच्या हालचाली सुरू आहेत. पण हा एक फ्रॉड आहे. पण विरोधी पक्षांनी 'इंडिया' आघाडी स्थापन केल्यापासून सरकारला भीती वाटू लागली आहे. त्यांना राज्य घटनेतील नावाचीच भीती वाटू लागली आहे.हा सरकारचा कद्रुपणा आहे, अशा शब्दांत राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
तसेच, देशात काही अनन्य साधारण परिस्थिती असेल तरच विशेष अधिवेशन घेतलं जात. मग देशात अशी कोणती परिस्थिती उद्भवली आहे. हे बारश्याचं निमंत्रण आहे की भाजपचा निरोप समारंभ, असा सवालही संजय राऊतांनी विचारला आहे.
विशेष अधिवेशन का बोलवलं आहे, विशेष अधिवेशनाचा कशासाठी बोलवलंय हे सांगितले जात नाही, ही कोणती हुकूमशाही, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी समाज आंदोलने करत आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे. हे मुद्दे या अधिवेशात मांडता येतील का?” असे सवाल करत संजय राऊतांनी अक्षरश: केंद्र सरकाला फटकारलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.