
Uddhav Thackeray and Prakash Ambedkar News : ''जो-जो प्रबोधनकारांचं वाचन वाचेल त्याला सामाजिक, राजकीय धार्मिक धक्का बसेल. या देशाची हजारो वर्षाची गुलामी प्रबोधनकारांनी तीन वाक्यात मांडली. हजारो वर्षाचा देशाचा गुलामीचा इतिहास आहे. पण ही व्यवस्था नष्ट करायची असेल तर आधी मनस्मृतीच्या बाहेर यावं लागेल, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणासाठी 'प्रबोधनकार डॉट कॉम' या संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळा आज मुंबईच्या दादरमध्ये पार पडला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकाच व्यासपीठावर आले.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, संतानी सांगितलेल्या दोन विचारसरणीमध्ये आपल्याला कोणती विचारसरणी हवी, हा येणारा काळ सांगेल.' 'प्रबोधनकार ठाकरे यांनी (Prabodhankar Thackeray) वैदिक परंपरेवर असूड मारलेला आहे. देशाचा विचार करायचा असेल तर हा धर्म सार्वजनिक कसा होईल यांची मांडणी त्यांनी केली. महात्मा गांधी, जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही धर्म नाकारला नाही. फुलेंनी सत्यसोधक धर्माचा पुरस्कार केला. महात्मा गांधीनी वर्णाश्रमाचा पुरस्कार केला. तर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांचा पुरस्कार केला. पण या तीनही मानसांनी धर्म कधीही नाकारला नाही. धर्म हा अवश्यकच आहे. या तिघांचेही धर्मांशी कधीही भांडण नव्हते. तर धर्मांनी सांगितलेल्या सामाजिक व्यवस्थेची त्यांचं भांडण होतं. पण या सामाजिक व्यवस्थेच्या भांडणाशी काय-काय सुधारणा हव्या होत्या याची मांडणी त्यांनी केली असल्याचे आंबेडकर म्हणाले.
जात नावाची व्यवस्था ही एक देश आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे आपण प्रबोधनकार वाचायला पाहिजेत, त्यांनी या व्यवस्थेवर असूड ओढलेला आहे. सध्या खरं भांडण हे लोकशाही आणि हुकूमशाही असं आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने हे ठरवलं पाहिजे, की आपल्याला लोकशाही हवी की हुकूमशाही. आम्ही देखील राजकीय पक्ष म्हणून यावर भूमिका मांडत असतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे आज एका मंचावर आले होते. या निमित्ताने नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.