पणजी : गोव्यातील निवडणुकांना (Assembly Election) आता काही दिवसच उरलेले असताना तृणमूल काँग्रेसने (TMC) भाजपच्या पराभवासाठी फासे टाकले आहेत. भाजपविरोधी आघाडीसाठी तृणमूलने काँग्रेस पक्षालाही आघाडीची हाक दिली आहे. त्यामुळे गोव्यात (Goa) मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोव्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीची (MahaVikas Aghadi) चर्चा सुरू असतानाच तृणमूलनेही साद घातल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) मागील आठवड्यात गोव्यात होते. त्यांनी काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीसोबत (NCP) जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे संकेत दिले होते. पण अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. यंदाच्या निवडणुकीत गोव्यात तृणमूल काँग्रेसनेही उडी घेतली आहे. काँग्रेससह राष्ट्रवादीला धक्का देत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी जम बसवण्याचा प्रयत्न केला आहे.
गोव्यातील तृणमूलच्या प्रभारी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्याकडून मागील काही दिवस भाजपसह (BJP) काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे. पण आता त्यांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी ट्विट करत त्यांनी भाजपच्या पराभवासाठी जेवढे शक्य आहे, तेवढे करणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी हे यापूर्वी करून दाखवलं आहे. आता गोव्यातही त्यासाठी प्रयत्न असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी गोवा काँग्रेससह गोवा फॉरवर्ड पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीलाही टॅग केले आहे.
गोव्यात सध्या काँग्रेसची गोमंतक फॉरवर्ड पार्टीसोबत (GFP) आघाडी झाली आहे. मोईत्रा यांच्या ट्विटवर मात्र काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) म्हणाले, तृणमूल पक्ष गोव्यात आल्यापासून काँग्रेसवर टीका करत आहे. त्यामुळे त्यांनी आधी आपलला विरोध कोण, काँग्रेस की भाजप? हे निश्चित करावे. ते काँग्रेसचे नेते फोडत आहेत. भाजपला पराभूत करण्याच्या मिशनमध्ये ते अडथळा निर्माण करत आहेत. गोव्यात काँग्रेसला हरवण्यासाठी तृणमूल आल्याचे चित्र सध्या नागरिकांमध्ये असल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता तृणमूलची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तृणमूलने एक पाऊल मागे घेतल्यास गोव्यात महाराष्ट्राप्रमाणेच महाविकास आघाडी अस्तित्वात येऊ शकते. तसे झाल्यास गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भाजपच्या विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागू शकतो.
भाजपनेच गोव्यात काँग्रेस संपण्यासाठी तृणमूलला आणल्याची चर्चाही गोव्यात असल्याची टीका चोडणकर यांनी केली. पण आम्ही कमकुवत नाही. गोव्यात काँग्रेसची शिवसेना व राष्ट्रवादीसोबत बोलणी अजूनही सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. गोव्यातील निवडणुका जाहीर झाल्याने आता काही दिवसांतच आघाडीचे चित्र स्पष्ट होईल. भाजपसह काँग्रेस, आप, तृणमूल, शिवसेना, राष्ट्रवादी यांसह काही स्थानिक पक्षांनी या निवडणुकीसाठी जोर लावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.