Mumbai News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता देशात मोदी गॅरंटी चालत नाही, असे सांगून सुधारीत वक्फ बोर्ड बिल, सेक्युलर कोड बिल, हिंदूंच्या मंदिरातून चोरी जात असलेल्या सोनं, तसंच वक्फ बोर्ड, हिंदू आणि इतर धर्माच्या जमिनींबाबतच्या चौकशीबरोबर मराठा आरक्षणाबाबत चॅलेंज दिलं.
"आरक्षणाची मर्यादा वाढवा, आम्हा महाविकास आघाडीचा पाठिंबा असेल", असे सांगत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना आगामी विधानसभा निवडणुकींचं चॅलेंज दिलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, मुस्लिम, बौद्ध, हिंदू, मराठी माणसांनी भरभरून मतदान केले. मुस्लिमांनी मतदान केले. कारण मी हिंदुत्व सोडलं. उद्धव ठाकरेंबरोबर मुसलमान आजही उभा आहे. कोरोना काळात सरकारने केलेले काम महायुती सरकारमध्ये जाताना आपले नालायक, ज्यांना आपण मोठं केले, ते विसरले. पण मुस्लिम, बौद्ध, असो किंवा हिंदू ते विसरले नाहीत. ते आजही आपल्याबरोबर आहेत. सीएए वेळी देखील महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु मुख्यमंत्री असताना जे इथले नागरीक आहेत, ते कोठेही जाणार नाही, असे ठामपण सांगितलं होते, याची आठवण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी करून दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भाषणात सक्युलर कोडवर भाष्य केले. त्याचा धागा पकडत 'सेक्युलर संविधान'! 'सेक्युलर नागरी संहिता', म्हणजे काय तुम्ही हिंदुत्व सोडलंत, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केला. हिंदुत्व न मानणारे नितीश कुमार आणि चंद्रबाबूंच्या मांडीला मांडी लावून बसला, म्हणजे तुम्ही काय हिंदुत्व नाहीत सोडलंत. मग उगाच आग लावण्याची वक्फ बोर्डाचं बिल का आणलत, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. हिंमत होती, बहुमत असताना मंजूर का केलं नाहीत. नोटबंदी आम्हाला विचारून केली होती. आम्ही तुमच्यासोबत होतो. पण सगळे मंत्री, कॅबिनेट मंत्री यांना लाॅक करून मोदीबाबा एकटे येऊन नोटबंदीची घोषणा केली. आज बहुमत असताना विधेयक मांडण्याचे नाटक, थेरं का केली तुम्ही. शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते, यावर बोलताना मी दिल्लीत होतो, त्यामुळे सगळे माझ्याबरोबर होते. त्या बिलावर चर्चा करताना खासदारांनी भूमिका मांडली असतीच, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
"वक्फ बोर्डाची जमीन डापून, उद्योगपतींच्या घशात घालणार असाल, हिंदू संस्थानच्या जमिनी तुम्ही लाटत आहेत. चोरत आहात. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या जमिनी लाटल्यात त्याची यादी काढा. या जमिनी कोणी लाटल्या, हा प्रश्न एका धसास लावा. माझ्या मंदिराची जमिनी चोरून त्या बिल्डरांना दिल्या जात आहेत. आज मी जाहीर करतो, वक्फ असेल, हिंदू धर्माच्या किंवा इतर कोणत्याही धर्माच्या जागा असतील, तर आम्ही त्यात वेडवाकडं अजिबात होऊ देणार नाही", असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
"अयोध्येत तुम्ही काय केलत, हे पाहिलं सर्व देशानं. कारसेवकांनी जे बलिदान केले, ते कशासाठी केलं. लोढासाठी केलं. रामदेवबाबा, श्रीश्री रविशंकर, अदानी यांच्यासाठी केलं. कारसेवकांच्या बलिदानानंतर राममंदिर उभं राहीलं. एक, तर राम मंदिर बांधल तुम्ही, ते गळकं, आमच्या हातामध्ये घंटा, अयोध्येमधील जमीन कोणत्या ट्रस्टने किती दराने विकत घेतली आणि कोणाला दिली, यावर देखील जेसीपी लावा", असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना दिले.
हा विषय वक्फ बोर्ड बिलाचा नाही, शंकराचार्य बोलत आहेत की, केदारनाथमधील दोनशे-अडीशचे किलो सोनं गायब झाल, त्याची देखील चौकशी लावा. तिथं पितळ कोणी नेऊन ठेवलं, याची देखील चौकशी झाली पाहिजे. पितळ उघडं पडलंच पाहिजे. मोदींची गॅरंटी चालत नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी प्रश्न आणि प्रयत्न करत असाल, तर जनता खुळी नाही, याकडे देखील उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले.
वक्फ बोर्ड बिलावर जेवढं तुम्ही बोलता, पण महाराष्ट्रात तुम्ही जी जाती-धर्मांमध्ये आग लावली आहे, मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणावरून तेढ निर्माण केली आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. बिहारने वाढवलेले कोर्टाने उडवली. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार लोकसभेला आहे, अन्यथा राष्ट्रपतींना आहे. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयाचा सल्ला घेऊन आरक्षणाचा मर्यादा वाढवता येऊ शकते. मग मराठा आरक्षणाचा बिल लोकसभेत आणा, आरक्षणाची मर्यादा वाढवा, ओबीसी आरक्षण तसंच ठेवा, धनगरांना द्या, सर्वांना द्या, आम्ही आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याच्या बिलाला महाविकास आघाडी पाठिंबा देतो. आगी लावून ठेवल्या आहेत. या आगींवर तुम्ही तुमच्या राजकीय पोळ्या भाजत आहात, हे खपवून घेणार नाही. त्यामुळे म्हणतो, एक तर आम्ही राहू, तुम्ही, असे सांगून पुढची लढाई तीव्र असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.