मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह बंड केले आहे. या आमदारांनी बंडाची विविध कारणे सांगितली आहेत. त्यामद्ये एक महत्त्वाचे कारण म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत आमदारांना सहज पोहचणे शक्य नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या भोवती असलेल्या चांडाळ चौकडीमुळेच बंड करत असल्याचे काही आमदारांनी सांगून राजकारणात खळबळ उडवून दिली. (Shivsena Political Crisis News)
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर
बंडखोर आमदारांनी या नेत्यांना चांडाळ चौकडी असे म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याजवळ कोण आहेत असा सवाल उपस्थित झाला आहे. बंडखोर आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याविषयी रोष आहे. मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे (Shivsena) सचिव आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांचे पीए सुद्धा आहेत. नार्वेकर ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आहेत. ठाकरेंच्या सर्व बैठका तेच ठरवतात. ठाकरेंना कुणाला भेटायला द्यायचे आणि कोणाला नाही हे तेच ठरवत असल्याचा आमदारांचा आरोप आहे. मर्जीतील लोकांनाच नार्वेकरांकडून प्रवेश दिला जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडताना सर्व रोष नार्वेकरांवर व्यक्त केला होता. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्ष सोडताना बडव्यांचा उल्लेख केला होता.(Shivsena Political Crisis News)
खासदार संजय राऊत
बंडखोर आमदारांमध्ये सर्वाधिक रोष हा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आहे. राऊत हे राष्ट्रवादीच्या सांगण्यानुसारच चालत आहेत. राष्ट्रवादीच्या दावणीला राऊतांनी शिवसेना बांधल्याचा थेट आरोप आमदारांनी केला आहे. शिवसेना आणि भाजपची हिंदुत्वाच्या मुद्यांवर नैसर्गिक युती आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादीसोबतची शिवसेनेची युती ही अनैसर्गिक आहे. मात्र, राउतांनीच ही अनैसर्गिक युती घडवून आणल्याचे त्यांचे मत आहे. राऊत प्रसारमाध्यमांसमोर ज्या पद्धतीने बोलतात ते शब्द जिव्हारी लागणारे असतात. जोडण्या ऐवजी तोडण्याची राऊत यांची भाषा असेत. त्यामुळे अडचणी वाढतात असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. राऊत हे मुख्यमंत्र्यांना चुकीचे मार्गदर्शन करत असल्याचाही आमदारांचा आरोप आहे. त्यांच्यामुळे मातोश्रीपर्यंत जाणे शक्य नसल्याचे आमदारांनी म्हटले आहे. आमदारांनी बंड केल्यापासून सर्वाधिक आरोप राऊत यांच्यावर झाले आहेत.
परिवहन मंत्री अनिल परब
राज्याचे परिवहन मंत्री असलेले अनिल परब (Anil Parab) हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे आहेत. मातोश्रीच्या परिसरातच ते राहतात. ते कायम मातोश्रीवर असतात. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओखळ आहे. शिवसेनेच्या अनेक निर्णय प्रक्रियेत त्यांचा महत्तवाचा सहभाग असतो. तसेच वकील असल्याने ते शिवसेनेची कायदेशीर बाजू सांभाळत असतात. परब यांच्यामुळेही मातोश्रीपर्यंत पोहोचता येत नसल्याची अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये त्यांच्या विषयीही मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई
वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ आहेत. तसेच ते युवा सेनेचे नेते आहेत. त्यामुळे ते आदित्य यांच्या अत्यंत जवळचे आहेत. वरुण सरदेसाई हे अत्यंत कमी वेळात शिवसेनेत नेते म्हणून पुढे आहे आहेत. त्यांचाही मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींमध्ये समावेश होतो. सरदेसाई यांना मातोश्रीचे दरवाजे नियमीत उघडे असतात. मात्र, इतरांना तेवढ्या सहजपणे मातोश्रीमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेत मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.