मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीत वाढलेले भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांचा राष्ट्रीय राजकारणातील दबदबा वाढला आहे. आमदारकीची तिकीट कापल्यानंतर अत्यंत संयमाने त्यांनी भाजपच्या संघटनात्मक कामात स्वत:ला झोकून दिलं. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Tahckeray), अजित पवार (Ajit Pawar), राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह अनेकांनी विचारपूस करायला फोन केले होते. पण पक्षात या म्हणण्याची हिंमत कुणीच केली नव्हती.
खुद्द तावडे यांनीच मागील वर्षी एका कार्यक्रमात ही आठवण सांगितली होती. तावडे यांना पक्षानं राष्ट्रीय संघटनेत बढती दिल्यानं त्यांचा संयम अन् पक्षनिष्ठेचे फळ मिळाल्याचे बोलले जात आहे. सध्या राष्ट्रीय सचिव व हरयाणाचे प्रभारी असलेल्या तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाकडून तावडे यांना आता राष्ट्रीय राजकारणातच अधिक जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.
भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्यानंतर तावडे यांचा वर्षभरापूर्वी बोरिवली येथे सत्कार करण्यात आला होता. यावेली बोलताना तावडे यांनी विधानसभेचे तिकीट कापल्यानंतरच्या आठवणींना उजाळा दिला होता. तिकीट कापल्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह अनेकांनी फोन केले होते. पण पक्षांतर कर म्हणण्याची हिंमत कुणीही केली नाही. कारण मी संघाच्या, विद्यार्थी परिषदेच्या मुशीत वाढल्याचे त्यांना ठाऊक आहे, असं तावडे म्हणाले होते.
तावडे हे बोरिवली विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये निवडून आले होते. त्यांना देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिक्षणमंत्री यांसह अन्य काही महत्वाची खाती देण्यात आली होती. राज्यातील भाजपच्या वजनदार व प्रमुख नेत्यापैकी एक आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम केले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष, अखिल भारतीय राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि भाजपचे समन्वय समितीचे ते प्रमुख सदस्य होते.
तावडे यांची 1995 मध्ये भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून निवड झाली होती त्यांची निवड 1999 पर्यंत होती. 2002 मध्येही त्यांच्यावर पुन्हा ही जबाबदारी सोपवण्यात आली. विधानपरिषदेत ते विरोधी पक्षाचे नेते होते. पक्ष संघटनेत अनेक वर्ष काम केल्याने त्यांना उत्कृष्ट संघटक म्हणूनही पक्षात ओळखले जाते. त्यामुळेच त्यांच्यावर हरयाणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. मागील काही महिन्यांपासून ते नाराज असल्याचीही चर्चा आहे. पण अत्यंत संयमी स्वभाव आणि पक्षनिष्ठेमुळे त्यांना पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडली. त्याचेच आज फळ म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस पद मिळाल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.