
नागपूर : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार, अमीत साटम, आशिष शेलार यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडच्या बाबतीत चर्चा घडवून आणली आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले. ‘ड्रेस कोड’वर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, पण भ्रष्टाचाराच्या आरोपांत तथ्य नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचे भ्रष्टाचाराचे आरोप खोडून काढले.
अजितदादा म्हणाले की, दोन लाखाच्या वर कर्ज असलेल्यांनी दोन लाख रुपयांच्या वरचे पैसे भरल्यावर दोन लाख सरकार देणार, हे ठरलं होते. पण दरम्यानच्या काळात कोरोनाने राज्यभर थैमान घातले. त्यामुळे काही कामे राहून गेली. पण परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर त्यावर निर्णय नक्की घेऊ. जम्बो कोविड हॉस्पिटलच्या कामांत भ्रष्टाचार झाला नाही. पिंपरीमध्ये भाजपची महानगरपालिका असतानाही हॉस्पिटल बनवले. त्यात राजकारण केले नाही. मुंबईत काही हॉस्पिटलमध्ये बेड्स आजपर्यंतही रिकामेच राहिल्याच्या विरोधकांच्या आरोपावर ते म्हणाले, चांगली गोष्ट आहे की बेड्स रिकामे राहिले. पण अंदाजित आकडेवारीनुसार जर रुग्णसंख्या वाढली असती, तर वेळेवर कुठे धावाधाव केली असती. तेव्हाही हेच विरोधक बोलले असते की, समजले नाही का? व्यवस्था आधीच करून ठेवायला पाहिजे म्हणून. विरोधकांचं काय, ते दोन्हीकडून बोलतात, असा टोमणा त्यांनी मारला.
साखर कारखानदारांच्या मदतीने सॅनिटायजर नियंत्रणात
ऑक्सिजन ८० टक्के हॉस्पिटल्स आणि २० टक्के इंडस्ट्रीला दिला. तेव्हा कुणीही नेमका अंदाज बांधू शकत नव्हते. सॅनिटायजरच्या बाबतीत दर कमी करण्याचे काम केले. १००० रुपये लीटर असलेले सॅनिटायजर साखर कारखान्यांना परवानगी दिल्यावर १५० ते २०० रुपये लीटरवर आले. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी यासाठी प्रयत्न केले. वैद्यकीय शिक्षण, मदत व पुनर्वसन. आरोग्य, पोलिस सर्व विभागांना निधी दिला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले कर्ज काढा. पण एकदम तसे करता येत नाही. जेव्हा गरज असते, तेव्हा पैसे कामी आले पाहिजे.
आजही ३० हजार ५३७ कोटी ६२ लाख रुपये केंद्राने दिले नाहीत. आपलाही टॅक्स जो मिळायला पाहिजे होता, तो मिळाला नाही. लोकप्रतिनीधींनाही ३० टक्के कात्री लावली. सर्वांनी त्यासाठी सहकार्य केले, त्याबद्दल आभार. १२००० कोटी रुपये पेंशन पगाराला जातात. तो पैसाही सरकारने थकवला नाही. साडेनऊ ते १० हजार कोटी डीपीसीला जातात, त्यालाही कात्री लावली नाही. तारेवरची कसरत केली, पण कोविड काळात कुठेही पैसा कमी पडू दिला नाही. खासदारांचा निधी केंद्राकडून थांबवण्यात आला. तो त्यांचा अधिकार आहे, पण आपण आमदारांच्या निधीला कात्री लावली नाही, असे अजितदादा म्हणाले.
निसर्ग चक्रीवादळ आले. त्यातही राज्याचे मोठे नुकसान झाले. पण चांद्यापासून बांद्यापर्यंत एकच राज्य आहे, असच आम्ही मानतो आणि कुठेही मदत कमी पडू दिली नाही. विजय वडेट्टीवारांचा प्रत्येक प्रस्ताव आम्ही मंजूर केला. धानाला ७०० रुपये बोनस दिला. २५०० रुपये शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी दिला. वडेट्टीवार आणि इतर मंत्र्यांनीही दिल्लीला पत्रव्यवहार केला. पण केंद्र सरकारची टीम शेवटपर्यंत पाहणी करायला आली नाही. कोकणामध्येही आम्ही मोठा निधी दिला. केंद्र सरकारच्या नियमांपेक्षा जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला. अर्थव्यवस्था पूर्ववत आणण्यासाठी स्टॅम्प ड्यूटी कमी केली. ‘सारथी’च्या निधीला कात्री लावल्याचा विरोधकांचा आरोपही अजित पवार यांनी खोडून काढला.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.