Mumbai News : महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह विधान करणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंविरोधात कारवाईचा आग्रह धरलेल्या आणि त्यानंतर धमकी आलेल्या माजी मंत्री यशोमती ठाकूरांना संरक्षण देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. एवढेच नव्हे ठाकूरांच्या धमकी प्रकरणाचा छडा लावून, दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचेही फडणवीसांनी विधानसभेत जाहीर केले. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या धमकी प्रकरणाच्या चौकशीची चक्रे वेगाने फिरणार आहेत. राजकीय नेत्यांना धमकावणाऱ्यांना सरकार धडा शिकविण्याची शक्यता आहे.
संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर कारवाईचा आग्रह धरला. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही विधीमंडळात त्यांच्यावर कारवाईचा आग्रह धरला होता. त्यांच्या या भूमिकांमुळे दोघांनाही धमकी देण्यात आली होती. या धमक्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या. संभाजी भिडे प्रकरणात ‘असंच बोलत राहिलात तर तुमचाही दाभोळकर करू’, अशी धमकीच यशोमती ठाकूरांना देण्यात आली होती. त्यावर “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे," अशी विनंती त्यांनी केली.
विरोधकांच्या मागणीला उत्तर देत महापुरूषांविरोधात त्यांच्या या मागणीला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. "अमरावती पोलिसांनी संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपच्या आवाजाचे नमुने घेतले जातील. असं सागंत फडणवीस म्हणाले, जे कोणी राष्ट्रीय नेत्याविरोधात अपमानकारक वक्तव्य करतील, त्यांच्यावर पोलीस कारवाई होईलच. संभाजी भिडे गुरूजी हिंदूत्त्वासाठी काम करतात. पण महापुरूषांवर वक्तव्य करण्याचा त्यांना कोणीही अधिकार दिलेला नाही. त्यांनाच काय कोणालाही महापुरूषावर वक्तव्ये करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे जर कोणी अशी वक्तव्ये केली तर त्याच्यावर कारवाई होईलच.
याच वेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांकडेही लक्ष वेधलं. काँग्रेसच मुखपत्र असलेल्या 'शिदोरी'मध्ये सावरकरांविषयी आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले. वीर सावरकर माफीवीर होते. ते समलैंगिक होते. ते स्वातंत्र्यलढ्यात नव्हते. ज्या प्रमाणे संभाजी भिडेंच्या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, त्याचप्रमाणे सावरकरांविरोधात लिखाण करणाऱ्या शिदोरी'वरही निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, असही फडणवीसांनी सभागृहात स्पष्ट केलं.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.