Ram Shinde - Prashant Gadakh
Ram Shinde - Prashant Gadakh

राम शिंदे व प्रशांत गडाख यांच्यात गुफ्तगू : जिल्हाधिकारी कार्यालयातील बंद खोलीत खलबते; राजकीय चर्चांना उधाण

पालकमंत्री राम शिंदे व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष, युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बंद खोलीत प्रजासत्ताकदिनी चर्चा झाली. भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गडाख यांच्या नावाची नगर लोकसभेसाठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चर्चेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

नगर : पालकमंत्री राम शिंदे व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष, युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बंद खोलीत प्रजासत्ताकदिनी चर्चा झाली. भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गडाख यांच्या नावाची नगर लोकसभेसाठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चर्चेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या दोघांमध्ये हे गुफ्तगू चालू असताना, भाजपचे खासदार दिलीप गांधी व आमदार मोनिका राजळे बाहेर उपस्थित होते. भारतीय जैन संघटनेच्या पुढाकारातून तलावातील गाळ काढणे व जलसंधारणाच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगरच्या जागेवरून घोडे अडले आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत लोकसभा लढविण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. सगळ्या राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीचा घोळ सुरू असताना, त्यात अडकून न पडता डॉ. विखे पाटील यांनी मतदारसंघात मोठी मुसंडी मारली आहे. त्यांच्या जनसंपर्काचा धडाका पाहता, त्यांना लढत देऊ शकेल, असा चेहरा आज तरी कुठल्याही पक्षाकडे दिसत नाही, असे राजकीय जाणकारांमध्ये बोलले जाते.

नेवासे तालुक्‍यात शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या माध्यमातून आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करणारे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे बंधू व जिल्ह्यात अराजकीय कामातून वेगळी ओळख निर्माण करणारे प्रशांत पाटील गडाख यांच्याशी "राष्ट्रवादी'कडून संपर्क साधला जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दोन दिवसांपूर्वी गडाख यांची त्यांच्या नगर येथील निवासस्थानी भेट घेतली. शिवाय भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठीही नगर लोकसभा व नेवासे विधानसभेसाठी गडाख बंधूंना गळ घालत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रशांत पाटील गडाख व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत 'वर्षा'मध्ये काही दिवसांपूर्वीच रात्री उशिरा एक तास चर्चा झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

या बाबीचा पुढचा टप्पा म्हणून पालकमंत्र्यांनी प्रशांत पाटील गडाख यांना प्रजासत्ताकदिनाच्या बैठकीचे औचित्य साधून चुचकारण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. 26) पालकमंत्री शिंदे व प्रशांत पाटील गडाख यांची बंद खोलीत चर्चा झाल्याचे अनेकांनी पाहिले. नंतर पालकमंत्र्यांनी आमदार राजळे यांनाही चर्चेसाठी आत बोलाविले. खासदार गांधी तेथे उपस्थित असताना, या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबाबत विविध आडाखे बांधले जात आहेत.

प्रशांत यांच्या उमेदवारीसाठी भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यांनी पुढाकार घेतल्याची माहिती हाती आली आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे दक्षिण नगर जिल्ह्यातील जुने संबंध, प्रशांत यांचा सामाजिक कामाचा चेहरा, तसेच शहरातील व बाहेरील मित्रांचे मैत्रीचे जाळे, या सर्वांचा फायदा घेण्यासाठी भाजपही या मतदारसंघात 'मास्टरस्ट्रोक' लगाविण्याच्या तयारीत आहे. अर्थात गडाख कुटुंबाचा एकही सदस्य सध्या तरी लोकसभेबाबत काहीही बोलत नाही; परंतु राष्ट्रवादी, भाजपकडून प्रशांत यांचा विचार नक्की सुरू असल्याचे जाणवते. तसे झाल्यास परत एकदा विखे-गडाख यांच्यामधील काट्याची टक्कर महाराष्ट्राला पाहायला मिळेल, यात शंका नाही.

गप्पांच्या ओघात राजकीय चर्चा झाली : प्रशांत गडाख
जैन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीस बोलाविले, म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो होतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत नगर उपकेंद्राच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी चर्चा झाली. गप्पांच्या ओघात काही राजकीय चर्चा होतातच..!, असे युवा नेते प्रशांत गडाख यांनी सांगितले.

चर्चा फलदायी : प्रा. शिंदे
युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांच्याशी प्रजासत्ताक दिनी बंद खोलीत चर्चा झाली. ही गोष्ट खरी आहे. विशेष म्हणजे, त्यावेळी आमदार मोनिका राजळे याही उपस्थित होत्या. चर्चा फलदायी झाली; परंतु तीमधील तपशील सांगण्याची ही वेळ नाही, असे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com