Nagar News : आमदार नीलेश लंके आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. त्यामुळे आमदार लंके या महायुतीच्या मेळाव्यात सहभागी होतील का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आमदार लंके यांना निमंत्रण मिळाले आहे की नाही, इथंपासून ही चर्चा आहे. त्यामुळे महायुती मेळाव्याच्या दिवशीच आमदार लंके यांची भूमिका नेमकी काय आहे, ते कळणार आहे.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचा मेळावा 14 जानेवारीला होत असून, नगर जिल्ह्यात याच्या तयारीच्या सूचना भाजपनेते तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी लोकसभा महाविजय 2024 चा आढावा बैठकीत दिल्या. या मेळाव्याला महायुतीमधील सर्व पक्षाच्या आमदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आले. असे असले, तरी या मेळाव्याला लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांचे पती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके (अजित पवार गट) हे उपस्थित राहणार का, याची उत्सुकता आहे.
भाजप महायुतीचे 14 जानेवारीला एकाच दिवशी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मेळावा घेऊन सभा घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यात 14 जानेवारीचा महायुती मेळावा यशस्वी होण्याची जबाबदारी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर टाकली आहे, तशी आढावा बैठक घेऊन त्यांनी नियोजनाच्या सूचना दिल्या. महायुतीच्या मेळाव्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय नियोजन सुरू आहे.
महायुतीत असलेल्या प्रत्येक घटक पक्षाला त्यांची जबाबदारी दिली गेली आहे. त्यानुसार कामेदेखील सुरू आहेत. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी महायुतीत असलेल्या प्रत्येक आमदार, पदाधिकारी यांना निमंत्रण गेले आहे. त्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन मंत्री विखे यांनी या बैठकीतून केले.
दरम्यान, महायुतीमधील अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके (nilesh lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुरू केली आहे. या यात्रेत राणी लंके यांनी लंके कुटुंबातील एक जण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असेल, असे जाहीर केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापना २२ जानेवारीला होणार आहे. या दिवशी उत्सव साजरा करायचा आहे. त्यामुळे सार्वजनिक सुटी द्यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुटीची मागणी करणाऱ्यांना फटकारले. सुटी हे थोतांड आहे. सुटी घ्यायची आणि सिनेमागृहात जाऊन बसायचे हे चालणार नाही. त्यामुळे सुटी मिळणार नाही.
राष्ट्रमंदिर ते राममंदिर असा हा प्रवास असल्याने २१ ते २६ जानेवारीपर्यंत देशात उत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी भाजपसह सर्वच रामभक्तांनी जोमाने तयारी करायची आहे. गावापासून ते जिल्ह्यातील प्रत्येक मंदिरावर विद्युत रोषणाई झाली पाहिजे. त्यासोबतच घरोघरी गोडधोड तयार झाले पाहिजे. अंगणासमोर सडे, रांगोळी घातली गेली पाहिजे, असे नियोजन करा, अशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे (radhakrishna vikhe) यांनी यावेळी केल्या.
(Edited by Sachin Waghmare)