
अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रूग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर प्रशासनही हातबल झाले होते. अशा वेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे लोकसभागातून शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर नावाचे कोविड सेंटर सुरू केले. या कोविड सेंटरमध्ये 1 हजार 100 बेड आहेत. हे कोविड सेंटर जगभरात कौतुकाचा विषय ठरले आहे.
रुग्णसंख्या ( patient ) घटू लागल्यानंतर सर्वत्र कोव्हिड सेंटर ( covid center ) कधीच बंद झालेले असताना आमदार नीलेश लंके ( MLA Nilesh Lanke ) यांच्या मार्गदर्शनाखालील भाळवणीचे हे कोविड सेंटर अजूनही सेवा देत आहे. सध्या तेथे 83 रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 23 हजार 738 रुग्णांनी तेथे उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. रुग्णांमधील कोरोनाची भीती दूर करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी रुग्णांना आधार दिल्याने या कोविड सेंटरमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. रुग्णाच्या मनातील कोरोनाची भीती दूर करण्यासाठी आमदार लंके यांनी तेथेच मुक्काम ठोकून केलेले समुपदेशन केले.
कोरोना रूग्णसंख्या वाढू लागल्यानंतर आमदार लंके यांनी पहिल्या लाटेमध्ये कर्जुल हर्या येथे एक हजार बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर सुरू करून तेथे 4 हजार 768 रूग्णांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर काही काळ गेल्यानंतर दुसऱ्या लाटेने घातलेल्या थैमानामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. इतक्या मोठया संख्येने रूग्णांची सोय कशी करणार असा प्रशासनापुढेही प्रश्न होती. जिल्हयापुरता विचार केला तर विविध साखर कारखानदारांकडे पायाभुत सुविधा असतानाही सुरूवातीच्या काळात कोरोनाच्या भीतीने कोविड सेंटर सुरू करण्यास कोणीही पुढे आले नाही.
आमदार लंके यांच्यापुढे प्रशासनाने लोकसहभागातून कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला असता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या पाठबळावर त्यास तात्काळ होकार दिला. दररोज एक हजार रूग्णांना उपचारासह जेवण, नास्ता तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे मोठे आव्हान होते. दोनच दिवसांत 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या सेंटरचा प्रारंभही करण्यात आला. दररोजच्या लाखो रूपयांच्या खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी आमदार लंके यांच्या सहकाऱ्यांनी उर्त्फुतपणे यथाशक्ती देणग्या जमा केल्या व हे काम मोठया जोमाने सुरू झाले. आमदार लंके समर्थक 150 कार्यकर्त्यांनी तेथे स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी पुढाकार घेतला. भाळवणी येथील भुजबळ कुटूंबियांनी त्यांचे प्रशस्त मंगल कार्यालय कोविड सेंटरसाठी मोफत उपलब्ध करून दिले.
एक आमदार केवळ कार्यकर्त्यांच्या पाठबळावर तब्बल 1 हजार 100 रुग्णांसाठी सर्वसोयींनी कोविड सेंटर सुरू करतो याची चर्चा जिल्हयासह राज्यभर सुरू झाली. माध्यमे, सोशल मीडियाच्या माध्यमातून लंके यांचे हे काम देशाबरोबरच जगभर पोहचले. त्यानंतर मात्र या सेंटरसाठी देशासह जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदींनी लंके यांच्या कामाचे कौतुक केले होते. शरद पवार यांनी रूग्णांसाठी अद्यावत रूग्णवाहिकाही भेट दिली होती. उत्तरप्रदेश सरकारनेही या सेंटरमधील सुविधांची दखल घेतली होती. तेथील मुख्य सचिवांनी थेट आमदार लंके यांच्याशी संपर्क साधून कशा पध्दतीने सुविधा पुरविल्या जातात याची माहिती घेतली होती.
या कोविड सेंटरमध्ये नॅचरोपॅथीचाही वापर करून रूग्णांवर उपचार करण्यात आले. रूग्णांच्या मनोरंजनासाठी भजन, किर्तन, प्रवचन, भारूड, ऑके्रस्ट्रा अशा कार्यक्रमांचे दररोज आयोजन करण्यात येते.
राज्यभरातील रुग्णांनी घेतला लाभ !
केवळ मतदार संघातील रुग्ण नव्हे तर तेथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला कोणत्याही अटीशिवाय उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार करण्यात आले.
स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष
औषधोपचारानंतरच्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यापासून संसर्ग होऊ नये याचीही काळजी घेतली गेली. दररोज सकाळी व संध्याकाळी आ. लंके यांचे कार्यकर्ते आरोग्य मंदिराची सफाई करतात. शौचालयांचीही सफाई करण्यासाठीही त्यांनी कधीच संकोच बाळगला नाही.
अशी आहे रुग्ण संख्या
शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर कर्जुलेहर्या : 4 हजार 768
शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर भाळवणी : 23 हजार 738
ऑक्सिजन उपचार घेतलेले रुग्ण : 4 हजार 275
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.