नगर : डाॅ. सुजय विखे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी व त्यांच्या गटाची नाराजी असणे स्वाभाविकच आहे. विशेषतः श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव आदी तालुक्यांत भाजपचा गांधी गट सक्रीय आहे. या गटाकडून पक्षाचे काम होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळेच हे नेटवर्क अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण जगताप यांना मिळणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी लढविणार की काँग्रेसला सोडणार, याबाबत खलबते सुरू होते. काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र डाॅ. सुजय विखे यांच्यासाठी ही जागा काँग्रेसला हवी होती. त्याबाबत मोठा काथ्याकुट होऊन अखेर राष्ट्रवादीने जागा सोडलीच नाही. परिणामी डाॅ. विखे भाजपमध्ये गेले. तेथे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचाही पत्ता कट झाला. गांधी यांनी दिल्लीपातळीवरून उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली, परंतु त्यात ते अपयशस्वी ठरले. त्यामुळे त्यांचे नेटवर्क असलेला गट, अल्पसंख्यांक जैन समाज तसेच इतर समाजाची त्यांची हक्काची मते साहजिकच जगताप यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
श्रीगोंदे तालुका हा जगताप कुटुंबियांची मायभूमी आहे. तसेच त्यांचा या भागात चांगला संपर्कही आहे. पाथर्डीत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल 'बरे झाले पीडा गेली' अशाच घोषणा देवून विखे यांचे भाजप प्रवेशाबद्दल प्रतिक्रया व्यक्त केली. त्यामुळे जगताप यांना ही जमेची बाजू होऊ शकेल. तसेच कर्जतमधील काही पदाधिकाऱ्यांनी कालच डाॅ. सुजय विखे यांच्यासोबत हाती कमळ घेतले आहे. परंतु, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा श्रीगोंदे-कर्जत येथील गट मात्र चांगला सक्रीय आहे. थोरात व विखे यांचे राजकीय मतभेद सर्वश्रूत असल्याने थोरातांचा हा गट आघाडीचे काम मन लावून करेल, अर्थात जगताप यांना ही जमेची बाजू मानली जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.