BUDGET 2021 - मेट्रोसाठी ५,८७६ कोटींची घोषणा म्हणजे महापालिका निवडणुकीची तयारी ?

महापालिका आयुक्तांनी विकास कामांना ब्रेक लावला असला तरी गडकरी यांच्या उत्स्फूर्त भाषणाने नगरसेवकांतही जोश भरल्याचे दिसून येते. अनेकांना गेल्या चार वर्षांत केलेल्या कामांची कागदपत्रे चाळणे सुरू केले आहे. दरम्यान, अजनीतील 'मल्टी मॉडेल हब'ला केंद्राकडून १२०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.
nmc-nagpur
nmc-nagpur

नागपूर : केंद्रात आणि महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. आज जाहीर झालेल्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ८७६ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. गेल्या १५ दिवसांत पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी विविध विकास कामांचे लोकार्पण केले. त्यामुळे आजची घोषणा ही पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी असल्याचे बोलले जात आहे. 

महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. जिल्हा परिषद, पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड दिली. मात्र, आता भाजपला महापालिका गमवायची नाही, असे भाजपने ठरविलेले दिसतेय. त्यामुळेच केंद्रांकडून विकासकामांसाठी वारंवार निधी दिला जात असल्याचे बोलले जात आहे. २०१५ मध्ये नागपूर आणि पुणे मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, अनेक दिवस काम संथ गतीने सुरू होते. २०१९ ची लोकसभा निवडणूक जवळ येताच मेट्रोच्या कामाचा वेग वाढला. निवडणुकीपूर्वी शहरात मेट्रो धावलीच पाहिजे, असा चंग जणू भाजपने बांधला होता. त्यानुसार त्यांनी ते पूर्ण करून दाखविलं. त्याचाच फायदा लोकसभा निवडणुकीमध्ये झाला. मात्र, त्यानंतर अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला जिल्हा परिषद आणि पदवीधर निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 

आता २०२२ च्या दुसऱ्याच महिन्यात नागपूर महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. महापालिका आपणच जिंकू, असा भाजपला विश्वास आहे. मात्र, त्यांच्यापुढे महाविकास आघाडीचे तगडे आव्हान आहे. कारण, राष्ट्रवादीनेही विदर्भात पाय पसरवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष मिळून भाजपला आव्हान देतील यात शंका नाही. त्यामुळेच सत्ताधारी भाजपने आपली कंबर कसली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला वित्तीय मान्यताच नव्हे, तर पुन्हा सल्लागार कंपनी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. तसेच केंद्राकडून तब्बल १६०० कोटी रुपयांची वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. 

मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरात एकूण ८६ हजार कोटींची विकास कामे झाली किंवा सुरू असल्याचे नमूद केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एक हजार कोटी शहराला दिल्याचेही त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे या कामांचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करा, अशा सूचना त्यांनी शहर भाजप अध्यक्षांना दिल्या. त्यामुळे आता भाजप महापालिका निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार झाल्याचे चित्र आहे. शहर सुंदर करायचे असेल तर महापालिका, राज्य, केंद्रात सरकार हवी, असे नमूद करीत त्यांनी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकप्रकारे कामाला लागण्याच्या सूचनाच केल्या. 

महापालिका आयुक्तांनी विकास कामांना ब्रेक लावला असला तरी गडकरी यांच्या उत्स्फूर्त भाषणाने नगरसेवकांतही जोश भरल्याचे दिसून येते. अनेकांना गेल्या चार वर्षांत केलेल्या कामांची कागदपत्रे चाळणे सुरू केले आहे. दरम्यान, अजनीतील 'मल्टी मॉडेल हब'ला केंद्राकडून १२०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच आता केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या फेजसाठी ५ हजार ९७६ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. ही मेट्रो कामठी, हिंगणा आणि बुटीबोरीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत फायदा मिळावा, यासाठीच केंद्र सरकार वारंवार नागपूरला निधी देत असल्याचे बोलले जात आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com