भंडारा-गोंदियात भाजपतर्फे आमदार परिणय फुके?

भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार उतरवायचा, यावरून भाजपमध्ये एकमत होऊ शकले नाही. जातीय समीकरणावरून आमदार परिणय फुके यांच्या नावावर अधिक भर दिला जात आहे.
भंडारा-गोंदियात भाजपतर्फे आमदार परिणय फुके?

भंडारा : भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार उतरवायचा, यावरून भाजपमध्ये एकमत होऊ शकले नाही. जातीय समीकरणावरून आमदार परिणय फुके यांच्या नावावर अधिक भर दिला जात आहे.
 
पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया हा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचे वर्चस्व असले तरी गेल्या निवडणुकीत त्यांनाही पराभव पचवावा लागला होता. यूपीएच्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री राहिलेले प्रफुल्ल पटेल यांच्या प्रभावाबद्दल या मतदारसंघात दुमत नाही. ते निवडणुकीत उतरण्याऐवजी त्यांच्या पत्नी वर्षा पटेल निवडणुकीत बाजी मारतील, असे बोलले जात आहे. पोटनिवडणुकीत मधुकर कुकडे यांनी राष्ट्रवादीकडे जागा खेचून आणली तरी ते निवडणुकीत उमेदवार राहणार नाहीत, असे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलत आहेत.
 
गेल्या काही महिन्यांपासून वर्षा पटेल या मतदारसंघात जनसंपर्क करीत आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यापेक्षा त्यांचे दौरेच अधिक वाढले आहेत. प्रफुल्ल पटेल सध्या राज्यसभेत असल्याने ते लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे बोलल्या जात आहे. 

पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजप मात्र सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. गेल्या पोटनिवडणुकीत भाजपने पोवार कार्ड खेळून पाहिले परंतु निराशा पदरी पडली. या भागात पोवार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजातील हेमंत पटले व खुशाल बोपचे उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत. यापूर्वी खुशाल बोपचे यांनी प्रफुल्ल पटेल यांना अस्मान दाखविले आहे. बोपचे मात्र भाजपच्या अंतर्गत गटात तेवढे सक्रिय राहिलेले नाहीत उलट ते ओबीसी संघटनांशी संधान बांधून ते कॉंग्रेसच्या अधिक जवळ गेल्याची भावना भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांमध्ये आहे. 

गेल्या पोटनिवडणुकीत कुणबी विरुद्ध पोवार असा सामना रंगला होता. या मतदारसंघात कुणबी समाजाची संख्या सर्वाधिक असल्याने कुणबी समाजाला उमेदवार देण्याचे भाजपमध्ये घाटत आहे. यात आमदार परिणय फुके यांचे नाव सर्वात पुढे आहे. आमदार फुके नागपूरचे असले तरी ते विधान परिषदेवर भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू असलेल्या फुके यांना या मतदारसंघात सर्व गटाचे समर्थन मिळू शकते, असा तर्क लावला जात आहे. याशिवाय आमदार चरण वाघमारे (तुमसर) यांचेही नाव चर्चेत आहे. भाजपकडून अद्यापही यापैकी कोणत्याही नावावर एकमत होऊ शकले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com