भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुनील फुंडे तर भाजपकडून सुनील मेंढे यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतरही कॉंग्रेसला ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडावी लागण्याची शक्यता आहे.
नाना पटोले यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीच्या फार्म्युल्यामध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सोडलेला आहे. नाना पटोले लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याने कॉंग्रेसने या मतदारसंघावर हक्क सांगण्याची शक्यता नाही.
या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात फुंडे यांचा प्रभाव आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचाही होकार फुंडेंच्या उमेदवारीला मिळण्याची शक्यता आहे.
भाजपतर्फे यावर्षी भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या नावाची चर्चा आहे. या मतदारसंघात दोन प्रमुख समाजाच्या नेतृत्वाचा प्रभाव आहे. कुणबी व पोवार समाजाच्या नेत्यांभोवती या जिल्ह्याच्या राजकारण फिरत राहिले आहे. फुंडे व मेंढे दोघेही कुणबी समाजाचे नेते आहेत.
भाजपतर्फे खुशाल बोपचे प्रभावी उमेदवार ठरू शकतात. बोपचे यापूर्वीही भाजपचे खासदार राहिले आहेत. ते पोवार समाजाचे आहेत. बोपचे ओबीसी महासंघाच्या चळवळीत सामील असून ही चळवळ सध्या कॉंग्रेसच्या अधिक जवळची मानली जात असल्याने भाजपचे वरिष्ठ नेते खुशाल बोपचे यांच्यावर कितपत विश्वास दाखवतील, याबद्दल साशंकता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.