आंबेडकरांची वंचित आघाडी अमरावती जिल्ह्यात बसपची जागा घेतेय  

अकोला जिल्ह्यात प्रबळ असलेली वंचित आघाडी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विदर्भात आता आपला प्रभाव निर्माण करताना दिसते आहे .
Ad.Prakash Ambedkar growing clout in Vidarbha
Ad.Prakash Ambedkar growing clout in Vidarbha

अमरावती  : कॅडर बेस अशी ओळख असलेल्या बहुजन समाज पार्टीचा (बसप) जिल्ह्यात करिश्‍मा संपल्यात जमा असून या पक्षाची जागा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने घेतली. अचलपुरात मतविभाजनाचा, तर धामणगाव मतदारसंघात वंचितचा फटका कॉंग्रेसला बसल्याचे काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणूक निकालाने स्पष्ट केले.

गेली पंधरा वर्षे विदर्भात आणि अमरावती जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीचा दबदबा राहिलेला आहे. बसपाच्या उमेदवारांचा फटका काँग्रेस - राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना सातत्याने बसला होता. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकात प्रकाश आंबेडकर यांचा अमरावती जिल्ह्यात प्रभाव वाढला असल्याचे चित्र आहे. अकोला जिल्ह्यात प्रबळ असलेली वंचित आघाडी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विदर्भात आता आपला प्रभाव निर्माण करताना दिसते आहे . 

जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये 14 लाख 92 हजार 306 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . बहुजन समाज पार्टीला आठ मतदारसंघांत 15 हजार 718 मते (1.5 टक्के), तर वंचित बहुजन आघाडीला सहा मतदारसंघांत 71,407 (4.78 टक्के) मते मिळाली. वंचित बहुजन आघाडी तसेच बसपला मिळणारी मते सर्वसाधारणपणे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळणारी मानली जातात.


 या अर्थाने भाजप-शिवसेनेऐवजी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभवात त्याचा वाटा गणला जातो. जिल्ह्यात कॉंग्रेसचे तीन उमेदवार (यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, बळवंत वानखडे), महाआघाडीतील दोन उमेदवार (रवी राणा, देवेंद्र भुयार), असे एकूण पाच उमेदवार विजयी, तर तीन उमेदवार (प्रा. वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख, केवलराम काळे) पराभूत झालेत.


धामणगाव मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मते कॉंग्रेसच्या पारड्यात टाकली, तर भाजपचे विजयी उमेदवार प्रताप अडसड यांच्या मताधिक्‍क्‍यापेक्षा 14,260 अधिक होतात, याचाच अर्थ या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा फटका कॉंग्रेसला बसल्याचे दिसते.


अचलपूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि रिपाइं यांची एकत्र मते बच्चू कडू यांच्या मताधिक्‍क्‍यापेक्षा 2055 ने कमी आहेत. मात्र वंचित, बसपा, रिपाइं व एमआयएमची 6,329 अशी एकत्रित 12,670 मते कॉंग्रेसच्या पारड्यात पडली असती, तर ती बच्चू कडू यांच्या 8,396 मताधिक्‍क्‍यापेक्षा 4,274 ने अधिक ठरली असती. 


याचाच अर्थ या मतदारसंघात मतविभाजनाचा लाभ प्रहार जनशक्ती पक्षाला मिळालेला दिसतो. मेळघाट मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावरील कॉंग्रेससह इतर पाच उमेदवार व नोटा पर्यायाच्या मतांची बेरीज 54,165 आहे. दुसऱ्या क्रमाकावरील भाजप व राजकुमार पटेल यांच्यातील मतांचे अंतर 41,362 आहे. त्यामुळे या मतदारसंघात केवळ राजकुमार पटेल हा एकमेव फॅक्‍टर चालल्याचे दिसत आहे.

 बळवंत वानखडे अव्वल
विधानसभा निवडणुकीत एकूण मतदानाच्या तुलनेत उमेदवारांनी मिळविलेल्या मतांच्या टक्केवारीत दर्यापूरातील बळवंत वानखडे अव्वलस्थानी आहेत. आमदारांना मिळालेल्या मतांची टक्केवारी बळवंत वानखडे 50.38, देवेंद्र भुयार 50.09, रवी राणा 48.46, सुलभा खोडके 47.81, यशोमती ठाकूर 43.89, बच्चू कडू 43.88, प्रताप अडसड 43.29 अशी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com