नवी मुंबई आयुक्तांचा दणका : बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिकेचे दोन अधिकारी निलंबित 

2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत अभय दिले जाणार नाही. बेकायदा केलेले बांधकाम तत्काळ पाडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अशा बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सोडणार नाही.- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त
Navi-Mumbai-Ramaswamy
Navi-Mumbai-Ramaswamy

नवी मुंबई  : महापालिकेने अर्धवट अवस्थेत कारवाई करून सोडून दिलेल्या बेकायदा इमारतींच्या झालेल्या पुनर्बांधणीप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

 कोणत्याही परिस्थितीत शहरात बेकायदा बांधकामांना थारा देणार नाही, असा संदेश आयुक्तांनी यातून दिला असल्याने  भूमाफियांचेही धाबे दणाणले आहे. 

बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही गय केली जाणार नाही, असा इशाराच यातून आयुक्तांनी दिला आहे.  ' सरकारनामा 'ने  याबाबत मंगळवारी  'मुंढेंनंतर प्रशासनाचा दरारा संपला' या मथळ्याखाली बातमी दिली होती. त्यानंतर ही कारवाई झाली. 

2016 मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदा बांधकामांवर धडाकेबाज कारवाई करून भूमाफियांना "सळो की पळो' करून सोडले होते.

मात्र, नंतरच्या काळात अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई धीम्या गतीने सुरू झाल्याने भूमाफियांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली होती.

प्रशासनाचा वचक कमी झाल्याने कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, ऐरोली, शहाबाज या गावांतील अर्धवट पाडलेल्या बेकायदा इमारतींची पुनर्बांधणी करण्यास भूमाफियांनी सुरुवात केली होती.

 त्याची दखल घेत रामास्वामी यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. शहरात एकीकडे कारवाई सुरू असताना आधी केलेल्या कारवाईबाबत उदासीनता का, असा जाब त्यांनी विचारला.

घणसोली, गोठीवलीसह इतर इमारतींवर केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर या प्रकरणी घणसोली विभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता व अधीक्षक यांच्यावर ठपका ठेवून त्यांना निलंबित केले. 

आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो; परंतु आता याप्रमाणे लवकरच अर्धवट पाडलेल्या बेकायदा इमारतींवर पुन्हा कारवाई करून, त्या पूर्णपणे जमीनदोस्त कराव्यात, अशी अपेक्षा आहे , अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी दिली आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com