पिंपरी : संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना मिळणारे स्वस्त जेवण बंद केल्याच्या धर्तीवर महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये आमदारांना सवलतीच्या दरात मिळणारे जेवण बंद करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी केली. त्यामुळे कोट्यवधी रुपये वाचतील, असे ते म्हणाले.
दरम्यान,युती राजवटीतील भाजप व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महत्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळणारे विद्यमान मुख्यमंत्री ठाकरे हे कोट्यवधी रुपये वाचविणारी कॅन्टीन सवलत बंद करण्याची भाजप आमदाराची ही मागणी मान्य करतात का याकडे आता लक्ष लागले आहे. तसेच ही सवलत रद्द करण्यास आमदार पाठिंबा देतील का हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे युतीच्या काळातील अनेक मोठ्या खर्चिक प्रकल्पांना आताच्या सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही खर्च बचतीची मागणी नवे सरकार मान्य करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
आमदार फार कमी वेळा विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये जेवतात. परिणामी स्वस्तात जेवण देण्याचा आमदारांना फार काही फायदा होत नाही, असे जगताप यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी त्याबाबत थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात,'संसदेच्या कॅन्टीनमध्ये सर्व खासदारांना स्वस्तात जेवण मिळत होते. त्यामुळे देशाच्या तिजोरीवर १७ कोटींचा बोजा पडत होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद कॅन्टीनमध्ये खासदारांना स्वस्त जेवण मिळावे यासाठी केंद्र सरकारकडून दिली जाणारी सबसिडी रद्द करण्याचा प्रस्ताव नुकताच लोकसभेत मांडला. त्याला सर्वपक्षीय खासदारांनी एकमताने मान्यता देऊन देशाचे दरवर्षी खर्च होणारे १७ कोटी रुपये वाचविले आहेत. महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टीनमध्येही राज्यातील आमदारांना सवलतीच्या दरात जेवण व इतर खाद्यपदार्थ दिले जातात. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कोट्यवधींचा बोजा पडत आहेत. आमदार फार कमी वेळा विधानभवनाच्या कॅन्टिनमधल्या जेवणाचा स्वाद घेतात. त्यामुळे स्वस्तात जेवण देण्याचा आमदारांना फार काही फायदा होत नाही. उलट राज्य सरकारचे पैसे नाहक खर्च होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टिनमध्ये आमदारांना सवलतीच्या दरात मिळणारे जेवण बंद करण्यात यावे. त्यामुळे शासनाची दरवर्षी कोट्यवधी रुपयांची बचत होईल.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.