Chinchwad By-Election News : कसबा पेठ आणि चिंचवडच्या भाजप आमदारांचे निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.मात्र,या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत. कसब्यात दिवंगत आमदारांच्या घरातील की बाहेरचा तो द्यायचा यावर मतैक्य झालेले नाही. तर चिंचवडला घरातलाच,पण पत्नी की भाऊ हे ठरत नाही अशी सद्यस्थिती आहे.
कसब्यातून लढण्यासाठी तेथील दिवंगत आमदार मु्क्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पती व मुलगा यांच्यासह पक्षाच्या पुण्यातील तिघांची नावे घेतली जात आहेत.मात्र, घरातील की घराबाहेरचा उमेदवार द्यायचा हे तेथे अद्याप ठरलेले नाही.
तर,त्याउलट स्थिती चिंचवडमध्ये आहे.येथे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्निनी आणि बंधू त्यांचे माजी नगरसेवक शंकर जगताप यांची नावे उमेदवारीसाठी घेतली जात आहेत. तेथे कुटुंबाबाहेरील भाजप(Bjp)च्या कुणाचे नाव पुढे आलेले नाही. चर्चेतही नाही.
घरातीलच पत्नी की भाऊ यावर एकमत तूर्तास झालेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षाचाही उमेदवार निश्चीत होऊ शकलेली नाही. भाजपचा उमेदवार येथे कोण असणार त्यावरच आघाडीचा म्हणजे राष्ट्रवादीचा उमेदवार असणार की नाही आणि कोण असणार हे अवलंबून आहे.
चिंचवडमधील उमेदवारीवरून पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे दिसून आले आहे. लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी यांना तिकीट द्यावे,यावर,मात्र शहर भाजपमध्ये एकमत आहे. दुसरीकडे ही जागा लढवावी अशी भावना शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही दिसून आली आहे.
त्यातूनच या मतदारसंघातून लढलेले या पक्षाचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांनी ही निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केली असल्याचे लगेच सांगितले आहे.
अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ही जागा लढायची की नाही याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दिवंगत आ. लक्ष्मणभाऊंच्या पत्नी अश्विनी या जरी भाजपच्या उमेदवार असल्या,तरी पक्ष जी भूमिका घेईल,ती मान्य असेल,असेही ते म्हणाले.
दरम्यान,चिंचवड लढवायचे ठरले,तर आयात उमेदवार चालणार नाही,असा सूचक इशारा तेथून इच्छूक राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सरकारनामाशी बोलताना काल दिला. तर,याबाबत अजितदादा हे उद्योगनगरीतील आपल्या पक्षाचे प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांशी दोन दिवसांत बोलून कानोसा घेणार आहेत.त्यानंतर याबाबतचे चित्र काहीसे स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.