पिंपरीः २०१७ ला निसटलेली श्रीमंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची (Pimpri Chinchwad) सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. त्यासाठी २०१७ ला भाजपमध्ये जाऊन त्यांना पालिकेची सत्ता मिळवण्यात कारणीभूत ठरलेल्या एकेका शिलेदाराला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सध्या पुन्हा स्वगृही आणत आहेत. त्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पिंपरीत लक्ष घातले आहे.
उपमुख्यंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,खासदार डॉ. अमोल कोल्हे ही दिग्गज नेतेमंडळी येत्या शनिवारी व रविवारी (ता. १६ व १७) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. आजी, माजी नगरसेवकांची बैठक आणि पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ते मार्गदर्शन करणार आहेत. बूस्टर डोस ठरू शकणाऱ्या या दौऱ्याकडे म्हणूनच शहर राष्ट्रवादीचे लक्ष लागले आहे. कारण यावेळी अनेकांचा पक्षप्रवेश होणार आहे. पण, त्याबाबत पक्षाने वाच्यता केलेली नाही.
प्रथमच पालिकेत सत्तेत आलेल्या भाजपच्या राजवटीत गेल्या साडेचार वर्षात शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले आहेत. त्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. भाजपच्या या गैरकारभारावर शरद पवार हे काय बोलतात, काय हल्लाबोल करतात, याकडे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्यांचा ही भेट तथा दौरा गेमचेंजर ठरणार का अशी चर्चा आतापासूनच पक्षात सुरु झाली आहे.
राष्ट्रवादीच्या शहरातील ज्येष्ठ नेतेमंडळींनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन शहरातील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची गळ आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घातली. शहरात लक्ष घालण्याची विनंती केली. ती त्यांनी लगेच मान्य केली. त्यानुसार त्यांची ही भेट होत आहे. त्याबाबत पक्षाच्या शहरातील नेत्यांनी पत्रकारपरिषद घेऊन गुरुवारी (ता.१४) माहिती दिली. यावेळी शहरातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास सांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला शहर अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर मंगला कदम, मुख्य प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर आदी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी शनिवारी शरद पवार हे आ. बनसोडेंच्या कार्यालयात येऊन तेथे सरकारच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल, त्याबाबतच्या मार्गदर्शन शिबिराचे उद्धघाटन करणार आहेत. त्यानंतर ते शहरातील पावणेदोनशे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेवकांची बैठक घेतील.तर, दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी ते रहाटणीत थोपटे लॉनमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी दुसऱ्या पक्षातील आणि त्यातही भाजपमधील काही पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, त्याबाबत पक्षाने झाकली मूठ सव्वा लाखाची अशी भूमिका तूर्तास घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.