Shirur News : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे (Department of Health) गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आढळून आल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाचा गरोदर महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (Larvae Found in Pregnant Women Food)
हा धक्कादायक प्रकार पुण्यातील शिरूर (Shirur) तालुक्यातील आंबळे (Amble) गावात घडला आहे. आरोग्य विभागाद्वारे गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषक आहाराच्या किटमध्ये अळ्या सापडल्या असून यामध्ये बदाम, खारीक,काजू , गूळ आणि इतर पोषण आहाराचा समावेश आहे. या आहारातील गूळ आणि काजूमध्ये किडे आढळल्याचं उघडकीस आलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या विषयाकडे लक्ष वेधून गांभीर्य पटवून देणारे सविस्तर वृत्त साम (Saam) वाहिनीने दिले. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या घटनेची तत्काळ दखल घेत 'साम'कडे पहिली प्रतिक्रिया दिली. अदिती तटकरे म्हणाल्या, स्थानिक अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अतिरिक्त शिधा दिला जातो. या प्रकरणाची प्राथमिक माहिती घेतल्यानंतर याबाबतची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शिवाय ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्या ठिकाणी अधिकारी जाऊन आले आहेत. त्या ठिकाणी नेमकं काय झालं? शिवाय हा शिधा किती ठिकाणी दिला आहे, तिथे काय आढळलं आहे का? याची चौकशी सुरू आहे. शिवाय या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन अदिती तटकरे यांनी दिली आहे. तर आरोग्य विभागाचा हलगर्जीपण समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. गर्भवतींना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या किटमध्येच या अळ्या सापडल्यांनं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
आंबळे गावातील घटनेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "पोषण आहाराच्या नावाखाली गरोदर माता, अंगणवाडीत अचानक छापेमारी केल्यास सर्व ठिकाणी निकृष्ट दर्जाचा माल सापडेल. सोनकीडे आणि अळ्या आढळणे ही पहिलीच घटना नाही. शिरूरमधील घटनेचे पुरावे आढळले, तरी त्याच्यावर कारवाई होत नाही. सरकारला त्यांचेच प्रश्न सुटलेले नाहीत. त्यांना गरोदर मातेच्या प्रश्नाशी देणेघेणे नाही. निवडणूक, जागावाटपात ही सर्व माणसे गुंतली आहेत," असा हल्लाबोल अंधारे यांनी राज्य सरकारवर केला.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.