Pune News : केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना (UPSC) चुकीची आणि खोटी माहिती देऊन आयएएस झाल्याचा आरोप पूजा खेडकर त्यांच्यावर होत आहे. या प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या स्तरावर केली जात आहे. यूपीएससीची परीक्षा देताना प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी खेडकर यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आयएएस पूजा खेडकर प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) (MPSC) आता मोठा निर्णय घेतला आहे. 'एमपीएससी'कडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी आता मुलाखतीच्या टप्प्यावर केली जाणार आहे. यासाठीचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 मधून मुलाखतीकरीता पात्र असलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
'एमपीएससी'च्या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी राज्यातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची केली जाणारी ही वैद्यकीय तपासणी अधिकच कठोर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या तपासणी मध्ये संबंधित सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोलपणे पडताळणी करून त्यामध्ये काही त्रुटी तर नाही ना याची शहानिशा केली जाणार आहे. या उमेदवारांची माहिती पुढील काळात कोणी मिळविल्यास आणि त्यातून काही वाद निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचारी अडचणीमध्ये येऊ नये, यासाठी आता अधिक गांभीर्याने याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे एमपीएससी मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आयएएस होण्यासाठी पूजा खेडकर यांनी अपंग असल्याचे सर्टिफिकेट दिले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांनी खोटी प्रमाणपत्रे देऊन अपंगत्वाचा फायदा घेतला असल्याचे गंभीर आरोप केले जात आहे. त्यामुळे आता एमपीएससी ने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. एमपीएससीच्या 2023 मधून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांची मुंबई येथे वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित उमेदवारांना स्वतंत्रपणे दिली जाणार आहे. दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीच्या सर्व सूचना व कार्यपध्दती तसेच वैद्यकीय तपासणीचा दिनांक व ठिकाण लवकरच संबंधितांना कळविले जाईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.