Sunil Kedar - Ashish Deshmukh

Sunil Kedar - Ashish Deshmukh

आशिष देशमुख - सुनील केदार यांच्या वादामागे दोघांचे ‘ते’ जुने वैर…

रणजीत देशमुख आणि त्यांच्या परिवारातील कुणालाही नंतर सावनेरमध्ये यश मिळविता आले नाही. केदारांनी राजकारण करताना एक-एक करून रणजीत देशमुखांच्या सर्व समर्थकांचा सफाया केला त्यामध्ये त्यांच्या सावजीसारख्या कट्टर समर्थकांचाही समावेश होता.
Published on

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Animal and Husbandary Minister Sunil Kedar) आणि काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख Katol's Former MLA Ashish Deshmukh यांच्यात गेल्या शनिवारी वादाची ठिणगी पडली. काटोलच्या आढावा सभेत केदारांनी त्यांच्या बाजूच्या खुर्चीवरून आशिष देशमुखांना उठवल्यामुळे अपमानित झालेल्या देशमुखांनी त्यांच्यावर लेटरबॉम्ब टाकला. हे भांडण काल-परवाचे दिसत असले तरी या वादाला मागे देशमुख आणि केदारांचे जुने वैर कारणीभूत आहे. सन १९९५ मध्ये केदारांनी आशिष यांचे वडील रणजीत देशमुखांचा सावनेरमध्ये पराभव केला होता. तेव्हापासून येथे केदार एके केदार हेच सूत्र सुरू आहे. 

१९८५ ते १९९० आणि १९९० ते १९९५ या काळात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख सावनेर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते राज्याचे कृषिमंत्री झाले. ते नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा होते. पण १९९५च्या निवडणुकीत सुनील केदार यांनी रणजीत देशमुख यांचा पराभव केला. त्या निवडणुकीनंतर शिवसेना - भाजप युती सरकारच्या काळात केदार मंत्रिसुद्धा राहिले. १९९५ मध्ये ते ऊर्जा, बंदर आणि परिवहन राज्यमंत्री होते. १९९५ ते आजतागायत १९९९ चा अपवाद वगळता ते पराभूत झाले नाहीत. १९९९ मध्ये भाजपचे आमदार देवराव आसोले यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर भाजपने कधीच या मतदारसंघात विजय मिळवला नाही. २०१४ मध्ये संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट होती. त्या लाटेत अनेक दिग्गजांना घरी बसावं लागलं. मात्र, केदार यांनी या लाटेतही निसटता का होईना विजय मिळवून सीट राखली होती.

रणजीत देशमुख आणि त्यांच्या परिवारातील कुणालाही नंतर सावनेरमध्ये यश मिळविता आले नाही. केदारांनी राजकारण करताना एक-एक करून रणजीत देशमुखांच्या सर्व समर्थकांचा सफाया केला त्यामध्ये त्यांच्या सावजीसारख्या कट्टर समर्थकांचाही समावेश होता. मतदारसंघात आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. केदारांनी देशमुखांचा पराभव केला, तेव्हापासून त्यांच्या जे वैर निर्माण झाले, ते आजही कायम आहे. हे शनिवार आणि रविवारच्या घडामोडींवरून दिसून आले. २०१९च्या निवडणुकीत डॉ. आशिष देशमुख नागपूर दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढले. तेथे त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागले. आता गेल्या काही दिवसांपासून ते २०१४ मध्ये आमदार म्हणून निवडून आलेल्या काटोल विधानसभा मतदारसंघात लक्ष घालू लागले आहे. त्यामुळेच काटोलच्या आढावा सभेत ते गेले होते. पण तेथे अपमान झाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केदारांचे मंत्रिपद बरखास्त करण्याची मागणी केली. 

‘तेव्हा’ देशमुख होते भाजपसोबत…
गत जिल्हा परिषद निवडणुकीत आशिष देशमुखांनी भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांना समर्थन दिले होते, असा दावा केदार समर्थकांनी केला आहे. ती जिल्हा परिषद निवडणूक शेवटी झालीच नाही. पण देशमुख भाजपच्या उमेदवारांसोबत उमेदवारी अर्ज भरायला गेले होते, असे केदार समर्थकांनी सांगितले. त्यांच्या या कृतीला पक्षविरोधी कारवाई समजून देशमुखांवरच पक्षाने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केदार यांचे समर्थक करीत आहेत. आशिष देशमुखांच्या पत्राची मुख्यमंत्री कितपत दखल घेतात, याकडे आता देशमुख आणि केदार समर्थकांसह राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

सुनील केदार नक्की काय म्हणाले होते?

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. आशिष देशमुख आमदार राहिलेल्या काटोल आणि नरखेड तालुक्यांत सुनील केदार यांनी नुकत्याच आढावा बैठका घेतल्या. त्या बैठकांसाठी डॉ. देशमुख यांना निमंत्रण नव्हते. तरीही ते काटोलच्या आढावा बैठकीला पोहोचले आणि थेट मंचावर जाऊन मंत्री सुनील केदार यांच्या बाजूला जाऊन बसले. हे बघून केदार आश्चर्यचकित आणि क्रोधीतही झाले. ‘तुम्ही येथे कसे काय आले, तुम्हाला कुणी बोलावले?’, असे केदारांनी विचारले. त्यावर ‘मी माजी आमदार आहे, माझा अधिकार आहे आढावा बैठकीमध्ये येण्याचा आणि अधिकाऱ्यांनी मला बोलावले आहे.’, असे उत्तर देशमुखांनी दिले. 

डॉ. देशमुखांचे उत्तर ऐकून मंत्री केदाराचा पारा चांगलाच भडकला आणि ते अधिकाऱ्यांवर खवळले. ‘तुम्हाला कळत नाही का, बैठकीला कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही. याच्यापुढे याद राखा मला विचारल्या, सांगितल्याशिवाय कुण्याही ऐऱ्यागैऱ्याला बोलावले तर.’, असे म्हणत केदारांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर तेथील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते. अधिकारीही चिडीचुप्प झाले आणि तशाच वातावरणात बैठक पार पडली. येथे सुनील केदार यांनी आशिष देशमुखांचा चांगलाच पाणउतारा केल्याचे बैठकीला हजर असलेल्या काही जणांनी सांगितले. 

त्यानंतरही आशिष देशमुख नरखेड येथील आढावा बैठकीला पोहोचले. मात्र येथे ते मंचावर गेले नाही तर जनतेसाठी मंचासमोर ज्या खुर्च्या ठेवल्या होत्या, तेथे पहिल्या रांगेत बसले. येथे मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. बैठक सुरळीत आटोपल्याचे सूत्र सांगतात. पण आशिष देशमुखांचा अपमान झाला होता. त्यामुळे ते चांगलेच खवळलेले होते. तेथून निघाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी देशमुखांनी मंत्री केदारांचे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे २० वर्षापूर्वीचे प्रकरण उखरून काढले आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केदारांना बरखास्त करण्याची मागणी केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com