betal bjp leaders

betal bjp leaders

Sarkarnama

या बेताल नेत्यांमुळे भाजपचा पाय खोलात!

या नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे भाजपला ट्रोल केले जाते...

नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे, प्रसाद लाड, राम कदम, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या या भाजप नेत्यांत साम्य काय? या नेत्यांनी केलेल्या काॅमेंटसच्या बातम्या वाचल्यानंतर त्यावर सोशल मिडियात उमटणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर हे साम्य लक्षात येते. ते म्हणजे हे सर्व नेते वैयक्तिक पातळीवर विरोधकांवर टीका करतात. त्यामुळे सोशल मिडियात या नेत्यांना धू धू धुतले जाते. त्यातून भाजपची प्रतिमा मलीन होते. 

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबद्दल केलेले ताजे वक्तव्य हे त्याचे उत्तम उदाहरण. वेळ पडल्यास सेनाभवन फोडू, असे लाड बोलले. त्या वक्तव्यावरुन भाजप आणी शिवसेनेच्या नेत्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फौरी झडत आहेत. भाजप आमदाराने वादग्रस्त व्यक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नसून या पूर्वीही अनेकांनी मुक्ताफळे उधळली आहेत. सुसंस्कृत पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षावर अशा बेताल नेत्यांमुळे अनेकदा नामुष्कीची वेळ आली आहे. संस्कृती पालनाचा ठेका आपल्याकडेच असल्याचा अविर्वभाव मिरवणाऱ्या भाजप आमदारांना नक्की झाले तरी काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

संघाचे संस्कार गेले कुठे?

भाजपच्या नेत्याची बोलण्याची एक शैली होती. कमीत कमी शब्दांत व्यक्तीगत पातळीवर टीका टिप्पणी न करता आपला मुद्दा मांडण्याचे एक कौशल्य होते. वादग्रस्त वक्तव्य न करता आपली बाजू भक्कमपणे मांडण्याची एक संभाषण कला त्यांच्याकडे आहे. मात्र, अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात भाजप नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भाजपमध्ये सुरुवातीला जास्तीत जास्त कार्यकर्ते हे राष्ट्रीय स्वयसेवक संघातून आलेले होते. त्यामुळे संघाच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांची भाषा शैली आणि काम करण्याची एक पद्धत ठरलेली होती. 

भाजपच्या नवीन कार्यकर्त्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेमध्ये अनेक मान्यवर नेते नवीन कार्यकर्त्यांना राजकारणाचे समाजकारणाचे धडे देत असतात. त्याच बरोबर भाजपची राष्ट्रीय, राज्यस्तरीय अनेक शिबिरे नियमीत होत असतात. भाजपच्या कार्यकर्त्यांची एक वेगळी ओळख राजकारणात आहे. भाजपमध्ये अभ्यासू आणि प्रभावी वक्ते आहेत. मात्र, सुसंस्कृत अशी प्रतिमा असलेल्या भाजपच्या प्रतिमेला तडा जातो की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचे दिसते. 

सारवासारव करण्याची वेळ

केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपमध्ये मधल्या काळात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. ताकद वाढवण्यासाठी इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. या नेत्यांना पक्षात घेऊन भाजपची ताकद वाढत असली तरी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षासाठी ती डोकेदुखी ठरत आहे. त्यासाठी नियमीत पक्षाच्या वरिष्ट नेत्यांना सारवासारव करावी लागत आहे. त्यावरुन प्रतिक्रिया व्यक्त कराव्या लागत आहेत. त्यामुळे या नेत्यांमुळे भाजपला ताकद मिळाली आहे की त्यांच्यामुळे प्रतिमा मलिन होत आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. 

राणे कुटुंब असते आघाडीवर

केंद्रीय मंत्री नारायण राणे हेही आपल्या विविध वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी नुकताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चिपळूण येथील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या गैर हजेरीवरुन प्रशासनाला धारेवर धरले होते. अधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना 'थांब रे तू, मध्ये बोलू नकोस' असे व्यक्तव्य केल्यामुळे त्याचीही राज्यभर चर्चा झाली. त्यातच आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांच्या विषयी बोलताना खालच्या पातळीवर टीका करत असतात. त्यांच्या विधानांचीही चर्चा होत असते. 

आदित्य ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका

नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी बोलताना त्यांच्या डीएनए तपासावा लागेल असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली होती. याआधीही भाजपचे आमदार राम कदम यांनी मुली पळवून आणण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याची झळ त्यांना आणि पक्षाला अजूनही सोसावी लागत आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन राज्यभरात मोठे वादंग उठले होते. आमदार गोपीचंद पडळकर यांचीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी बोलताना जीभ घसरली होती. तर प्रशासन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याच्या आड आले तर वाद विकोपाला जाईल. आणि मिरजेला दंगल काही नवीन नाही असे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी म्हटले आहे. पडळकर यांच्या वक्तव्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही खुलासा करावा लागला होता. तर प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया द्यावी लागली.

या साऱ्या परिस्थितीचा भाजपने विचार करायला हवा. तीन पक्षांचे कार्यकर्ते एकीकडे आणि भाजपचे कार्यकर्ते दुसरीकडे असा हा सामना आहे. विरोधी नेत्यांना ट्रोल करण्याची भाजपची शैली आता महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उचलली आहे. त्यामुळे भाजपच्याबद्दल नकारात्मक वातावरण तयार करण्यात हे कार्यकर्ते तयार झाले आहेत. त्यात स्वतः भाजपच्या नेत्यांनीच वादग्रस्त वक्तव्य करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याचा उद्योग सुरू असतो. त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्यावर साहजिक तुटून पडतात आणि त्यातून भाजपच्या प्रतिमेलाच तडा जातो. भाजपला हे समजत नसेल, असे नाही. पण असे बोलणाऱ्यांचे कान पिळणारा प्रदेश भाजपमध्ये कोणी आहे की नाही, हाच प्रश्न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com