कोथरूडकर झालेल्या चंद्रकातदादांनी पुण्याला भरभरून पदे दिली...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मताचे भरभरून दान देणाऱ्या पुण्याला भारतीय जनता पक्षानेही निर्णायक असलेली राज्य पातळीवरील महत्वाची पदे दिली आहेत. त्यात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासह विविध आघाडीच्या प्रमुखपदाचीही जबाबदारी पक्षाने पुणेकरांवर सोपवली आहे.
यात भाजप प्रदेश, महिला आघाडी, भारतीय किसान मोर्चा आणि ओबीसी मोर्चा आदी आघाडींचे प्रदेशाध्यक्षांचा समावेश आहे. एकाच जिल्ह्याच्या वाट्याला एकच पक्षाची राज्यस्तरावरील एवढी पदे कदाचित प्रथमच आली असावीत.
पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांची आगामी काळात निवडणूक लागणार आहे. त्यादृष्टीनेही भाजपने तयारी चालवल्याचे दिसून येते. विदर्भात मजबूत असणाऱ्या या पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही पक्षात वर्चस्वाची लढाई रंगण्याची चिन्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये आले. कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत पक्ष नावापुरताच होता. तेथेही आता पक्षाचे केडर चांगल्या रीतीने तयार झाले आहे. बडे नेते पक्षात आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या 21 जागा आहेत. येथे राष्ट्रवादीला नेहमीच चांगले यश मिळाले. राज्यात क्रमांक एकचा पक्ष व्हायचा असेल तर पुण्यात जोरदार तयारी असली पाहिजे. म्हणूनच प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांकदादांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे.
उमा खापरेंकडे महिला मोर्चाची जबाबदारी
आमदार चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असले तरी ते विधानसभेला पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्याच्या भाजप प्रमुखपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे हे पद पुण्याकडेच आहे. चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने पुण्याकडे प्रथमच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आलेले आहे. चंद्रकांतदादा हे आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडत असतात. पुण्याच्या प्रश्नातही ते तेवढेच लक्ष घालतात.
पिंपरी चिंचवडमधील उमा खापरे यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या माहिला मोर्चाचे नेतृत्व सोपवण्यात आलेले आहे. त्या पक्षाच्या निष्ठावंत मानल्या जातात. त्यांनी पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे. त्यांना आता पक्षाने राज्य स्तरावर संधी दिली असून त्याही सध्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून लढत असतात. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाईसाठी उमा खापरे यांनी महिला आघाडीच्या वतीने आंदोलनाची हाक दिली होती. तसेच, धनंजय मुंडे प्रकरणातही खापरे यांनी आवाज उठवला होता.
टिळेकरांना दुसऱ्यांदा संधी
पुण्यातील हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने ३ जुलै २०२० रोजी ओबीसी मोर्चाचे राज्याचे प्रमुखपद दुसऱ्यांदा सोपवले आहे. तत्पूर्वीही ते हे पद सांभाळत होते. टिळेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात. टिळेकर यांनी २०१४ ते २०१९ या दरम्यान हडपसर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला.
किसान मोर्चाचे नेतृत्वही पुण्याकडे
शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावत ठेवण्याचे काम करणारे वासुदेव काळे या आणखी एका निष्ठावंताकडे पक्षाने राज्यस्तरावरील महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. विदर्भातील माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्याकडे असलेले किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद काढून ते पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील काळे यांच्याकडे सोपवले आहे. काळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची खिंड पुणे जिल्ह्यात लढवलेली आहे. निष्ठावंत असलेल्या काळे यांच्या कामाची पक्षाने कदर करून त्यांना राज्यस्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
प्रदेशाध्यक्षांचे पुणे शहर
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे (पिंपरी चिंचवड), भाजपच्या भारतीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे (दौंड), भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर (हडपसर) ही भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, तर राष्ट्रवादी महिला
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर तसेच जनता दल युवाचे (देवेगौडा गट) प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे हेही पुणे जिल्ह्यातीलच आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.