rajbhavan smuggling smuggler found  ministers house
rajbhavan smuggling smuggler found ministers houseSarkarnama

राजभवनाचा वापर स्मगलिंगसाठी आणि स्मगलरच सापडला मंत्र्याच्या घरात

२१ व २२ आॅक्टोबर १९८४ च्या मध्यरात्री हा प्रकार उघडकीला आला आणि राज्याला धक्का बसला. हा प्रकार घडला कसा याची हकिकत तत्कालिन पोलिस अधिकारी इसाक बागवान यांनी आपल्या आत्मचरित्रात सविस्तर लिहिली आहे. त्या आधीची पार्श्वभूमीही त्यांनी या आत्मचरित्रात नमूद केली आहे. या सगळ्या प्रकारामागचा सूत्रधार होता केशव. मुंबई पोलिस दलातून बडतर्फ झालेला एक काँन्स्टेबल. अवैध दारूची ने-आण केल्याच्या प्रकरणात तत्कालिन अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्युलिओ एफ. रिबेरो यांनी त्याला डिसमिस केले होते. त्यानंतर केशव राजकारणात शिरला. युथ काँग्रेसचा शहराध्यक्षही झाला.

गेल्या वर्षभरात मुंबईचे राजभवन चांगलेच चर्चेत आले. कोरोनाच्या काळात विद्यापीठांच्या परिक्षा घ्यायचा मुद्दा असो व राज्यातली प्रार्थनास्थळे सुरु करण्याचा मुद्दा....किंवा राज्यपाल नियुक्त सदस्य विधानपरिषदेवर नेमण्याचे राजकारण. राज्यपाल चांगलेच अॅक्टिव्ह होते. त्यामुळे राजभवन हा बातम्यांचा विषय बनला. १९८४ साली हेच राजभवन बातमीचा विषय बनले होते. ते तिथल्या समुद्रकिनाऱ्यावरुन केल्या जाणाऱ्या स्मगलिंगमुळे....

मुंबई आणि त्या पट्ट्यातले समुद्रकिनारे म्हणजे एकेकाळी स्मगलरांचे नंदनवनच. कस्टम ड्युटी चुकवून आणलेला चोरटा माल समुद्र किनाऱ्यावर उतरवला जायचा. अशाच एका टोळीने अत्यंत सुरक्षित जागा हा माल उतरवण्यासाठी निवडली होती. या जागेवरुन थेट पोलिसांच्या नाकाखालून स्मगलिंगचा माल मुंबईत यायचा आणि ग्राहकांना विकला जायचा. ही जागा होती महाराष्ट्राचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख राहतो ती....अर्थात राजभवन!
 
सत्तर आणि ऐंशीच्या दशकात देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर स्मगलिंगचे प्रमाण प्रचंड वाढले होते. हाजी मस्तान मिर्झा, सुकूर नारायण बाखिया या सारख्या स्मगलरांची चांगलीच चलती होती. समुद्रमार्गे सोने, चांदी, घड्याळे, ट्रांझिस्टर्स आणले जाऊन ते बाजारात विकले जायचे. कधी कस्टम, पोलिसांना चकवून किंवा कधी त्यांचे हात ओले करुन हा स्मगलिंगचा माल मुंबईमार्गे देशात यायचा. अलिबाग, म्हसाळा, श्रीवर्धनचे किनारे त्यासाठी सुरक्षित होते. मुंबईच्या किनाऱ्यावर किंवा गोदीतही काही माल छोट्या होड्यांतून यायचा. थेट गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत हे काळे धंदे चालायचे.

हे स्मगलर्स सतत सुरक्षित जागा शोधत असायचे. या स्मगलर्सचे लँडिंग एजंट असायचे. त्यांच्यावर माल उतरवून घेण्याची जबाबदारी असायची. अशाच एका लँडिंग एजंटने एक अफलातून जागा शोधून काढली. मुंबईच्या राजभवन मागचा समुद्रकिनारा....

मुंबई राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. मुंबई शहरातील ती एक अतिशय सुंदर वास्तू आहे. राजभवन अंदाजे ५० एकर जमिनीवर वसलेले आहे व त्याच्या तीनही बाजूंना समुद्र आहे. मलबार हिल येथील राजभवन संकुल हे मैलभर लांब असलेली दाट वने, वाळुचे समुद्र किनारे आणि अनेक प्रकारच्या टवटवीत हिरवळीने व्यापले आहे. मुंबई राजभवनाबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते दीड शतकांपासून इतिहासाचे ते साक्षीदार आहे.

हे राजभवन चर्चेत येते ते निवडणुकानंतरच्या सत्तासंघर्षात. कधी त्यात सापडलेल्या बंकर्सचही चर्चा होते. पण १९७४ मध्ये राज्यपालांच्या या निवासस्थानाची चर्चा झाली तरी राजभवन स्मगलिंग केसमुळे. वर उल्लेख केलेल्या लँडिंग एजंटने जी जागा निवडली होती ती थेट राजभवनमागच्या किनाऱ्यावर होती. या किनाऱ्यावर जाण्यासाठी एकमेव मार्ग होता तो राजभवनाच्या आवारातूनच. राजभवन म्हटले की तिथे पोलिस बंदोबस्त असायचाच. अशा कडेकोट बंदोबस्तात हा माल उतरवला जायचा आणि पोलिसांच्या नाकाखालून तो शहरात नेला जायचा. 

२१ व २२ आॅक्टोबर १९८४ च्या मध्यरात्री हा प्रकार उघडकीला आला आणि राज्याला धक्का बसला. हा प्रकार घडला कसा याची हकिकत तत्कालिन पोलिस अधिकारी इसाक बागवान यांनी आपल्या आत्मचरित्रात सविस्तर लिहिली आहे. त्या आधीची पार्श्वभूमीही त्यांनी या आत्मचरित्रात नमूद केली आहे. या सगळ्या प्रकारामागचा सूत्रधार होता केशव. मुंबई पोलिस दलातून बडतर्फ झालेला एक काँन्स्टेबल. अवैध दारूची ने-आण केल्याच्या प्रकरणात तत्कालिन अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्युलिओ एफ. रिबेरो यांनी त्याला डिसमिस केले होते. त्यानंतर केशव राजकारणात शिरला. युथ काँग्रेसचा शहराध्यक्षही झाला. 

त्यानंतर त्याने रिबेरो यांच्यावर सूड उगवण्याची संधी साधली. एका रात्री अचानक वर्षा बंगल्यातून तत्कालिन मुख्यमंत्र्यांची गाडी बाहेर पडली. काही मिनिटांतच ही गाडी धारावीत पोहोचली. या गाडीत मुख्यमंत्र्यांबरोबर होता केशव. मुंबईतल्या हातभट्ट्यांचे दर्शन त्याने मुख्यमंत्र्यांना घडवले. माध्यमांमध्ये या प्रकरणाची बोंबाबोंब झाली आणि मुख्यमंत्र्यांनी रिबेरोंची बदली रेल्वे विभागात केली. या निर्णयाने पोलिसांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. पण अखेर पोलिसांना केशवला धडा शिकवण्याची संधी मिळाली ती राजभवन स्मगलिंग केसच्या माध्यमातून.

त्या काळात स्मगलर्सची चलती होती. माल उतरवण्याच्या अनेक जागांपैकी एक जागा होती राजभवनच्या मागचा समुद्रकिनारा. राजभवनचाच भाग असल्याने अत्यंत संरक्षित. एका रात्री राजभवनात स्मगलिंगचा माल पकडल्याची माहिती आयुक्त रिबेरोंना मिळाली. त्यांनी तात्काळ क्राईम ब्रँचला अॅलर्ट केले. अफगाण काॅन्स्युलेटच्या बाजूला राजभवनाचे आऊट गेट आहे. त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या एसआरपी, पोलिस यांच्या जेवणाच्या डब्यात घड्याळे आणि चांदी सापडली. या साऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर कारवाईही झाली. मग पोलिसांनी प्रयत्न सुरु केले ते या स्मगलिंग रॅकेटच्या सूत्रधाराला केशवला पकडण्याचे. त्यावेळी पकडल्या गेलेल्या मालाची किंमत होती तब्बल ५० लाख रुपये.

क्राईम ब्रँचने केशवला शोधण्याचे प्रयत्न सुरु केले. एक दिवस स्वतः बागवान केशवच्या घरी थडकले. केशव घरी नव्हताच. पोलिसांनी केशवच्या घराची झडती घेतली. घरात काही सापडले नाहीच. कारण केशव सावध झाला होता. बागवानांनी केशवच्या घरच्या नोकराला बोलण्यात गुंतवलं आणि तो कुठे आहे याची माहिती काढून घेतली. मिळालेली माहिती धक्कादायक होती. केशव त्यावेळी एका मंत्र्याच्या घरात होता.  तत्कालिन वरिष्ठ मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी त्यांच्या कार्यालयातच बसला होता. त्याला अटक करणारे पोलिस अधिकारी गेले तेव्हा केशव मोठ्या ऐटीत तिथे बसला होता. गुर्मीतच त्याने पोलिसांना 'नंतर येतो' असे ऐकवले. पण त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या बागवान यांनी मंत्रीमहोदयांना विनंती केली आणि मग केशवला पोलिसांबरोबर जावेच लागले. 

आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये बातमी होती 'मेन ब्रेन बिहाईंड राजभवन स्मगलिंग केस अॅरेस्टेड अॅट मिनिस्टर्स बंगलो' गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच मोठा हादरा बसला. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आयुक्त रिबेरोंना बोलावून घेतले. रिबेरो बागवानांना घेऊनच मुख्यमंत्री कार्यालयात गेले आणि त्यांनी सगळी वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगितली. 

पुढच्या काळात केशवच्या आयुष्यात खूप उलथापालथ घडली. १९९० मध्ये त्याने काँग्रेसच्या तिकिटावर कोकणातून विधानसभेची निवडणूक लढवली. नंतर त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी घेतली. नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची हकालपट्टी केली. केशवची दोन लग्नं झाली होती. दरम्यानच्या काळात त्याने प्रचंड मायाही जमवली होती. मात्र, त्याच्या घरात मालमत्तेवरुन वाद होते. अशाच एका वादात २००९ मध्ये भडक माथ्याच्या केशवच्या हातून आपल्या मुलाचा गोळी घालून खून झाला. 

आज खुल्या अर्थव्यवस्थेमुळे स्मगलिंगचे रुप बदलले आहे. परदेशात बनवल्या जाणाऱ्या महागड्या वस्तू नव्या पिढीच्या हातात झळकायला लागल्या आहेत. मात्र, १९७० आणि १९८० च्या दशकाने याच स्मगलिंगने मुंबईचे किनारे गाजवले होते. हाजी मस्तान, सुकूर नारायण बाखिया, स्वतः दावूद इब्राहिम अशी नांवे त्यावेळी पेपरात गाजत होती. या स्मगलिंगच्या कहाण्या नंतर रुपेरी पडद्यावरही उतरल्या. आज हे सगळेच विस्मरणात गेले आहे. अगदी राजभवन स्मगलिंग प्रकरणही!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com