Pimpri-Chinchwad : पिंपरी : ऐन गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) एक अत्यंत खळबळजनक व ह्रदयद्रावक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून इंजिनिअरिंगच्या तरुणाने तो प्रेम करीत असलेल्या व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या (एमबीबीएस) तरुणीच्या सात वर्षीय भावाचे अपहरण करून त्याचा खून केला. त्यामुळे एकुलता एक मुलगा असलेल्या पिंपरीच्या मासूळकर कॉलनीतील एका बांधकाम व्यावसायिकावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, आरोपीने या प्रकरणाला खंडणीचा रंग देऊन पोलिसांची (Police) दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तब्बल वीस कोटी रुपयांची खंडणी त्यांनी या मुलाच्या सुटकेसाठी मागितली होती. मात्र, हाच बनाव त्यांच्या अंगलट आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांचे गुंडाविरोधी पथक व या पथकाचे एपीआय हरीश माने यांनी सीसीटीव्ही फूटेजसह इतर तांत्रिक मुद्यांच्या आधारे तत्पर तपास करीत आरोपीच्या मुसक्या २४ तासांतच आवळल्या. मंथन किरण भोसले असे त्याचे नाव आहे. तो इंजिनिअरींगचा विद्यार्थी असून या गुन्ह्यातील फिर्यादी बांधकाम व्यावसायिक राहत असलेल्या सोसायटीतच तो राहत आहे.
या गुन्ह्यातील त्याचा साथीदार अनिकेत श्रीकृष्ण समुद्रे याचीही धरपकड करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंथनचे या व्यावसायिकाच्या मेडिकलला शिकणाऱ्या मुलीवर प्रेम होते. त्याचा हा कारनामा समजताच त्यांनी त्याला बोलावून खडसावले होते. त्याचा राग मनात धरून त्यांना धडा शिकवण्याचे त्याने ठरवले. परवा सायंकाळी त्याने अनिकेतसह खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या या व्यावसायिकाच्या सात वर्षीय मुलाचे मोटारीतून अपहरण केले. त्यासाठी त्याला आत्याने तुला बोलावले आहे, अशी खोटी सबब सांगितली. मोटारीतच त्याचा गळा आवळून खून केला.
नंतर त्याचा मृतदेह भोसरी एमआयडीसीत टाकून दिला होता. इकडे खेळायला मुलगा न परतल्याने त्याच्या वडिलांनी पिंपरी पोलिस ठाण्यात त्याच्या अपहरणाची फिर्याद दिली. त्यानंतर पोलिस चक्रे वेगाने फिरली. घटनेचे गांभीर्य ओळखून समांतर तपास करणाऱ्या गुंडाविरोधी पथकाचे एपीआय माने याने संशयित मंथनकडे विचारणा केली. पण, त्याने ताकास तूर लागू दिली नाही. पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.
दरम्यान, सदर मुलगा बेपत्ता झाल्याचे कळताच शहरातील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनने त्याच दिवशी याची दखल घेतली. या मुलाबाबत माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र, त्याचा खून झाल्याचे समजताच लांडगेंनी या घटनेचा तीव्र निषेध करीत त्यातील आरोपीला कठोर शिक्षा लवकरात लवकर देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना पुन्हा घडणार याची पोलिसांनी दक्षता घ्यावी आणि नागरिकांनीही त्यासाठी सतर्क रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.