

Ajit Pawar Death News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांचे मंत्रिमंडळाचे सहकारी, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दादांच्या व्यक्तिमत्वातील विविध कंगोरे, त्यांची काम करण्याची पद्धत, राजकारणापलीकडील मैत्री यावर फडणवीसांना भाष्य केले आहे.
दादांच्या बाबतीत मित्र कसा असतो, हे मी अत्यंत जवळून अनुभवले आहे. दादा हे कायम माझे मित्र होते.आम्ही 2019 पासून आम्ही जवळून काम केले असले तरी त्याही पूर्वी विकासाच्या किंवा राज्यहिताच्या विषयांवर आम्ही एकमेकांबरोबर होतो. दूरगामी व्हिजन असलेले नेते फार कमी असतात. दादा हे त्यापैकी एक. शब्दाला जागणारा नेता, कितीही संकट आले तरी शब्दाला किंमत असते आणि प्रसंगी ती किंमत मोजायचीही असते, हे दादांकडून शिकण्यासारखे आहे. काही इनिंग आम्ही नव्याने सुरू केल्या होत्या, ही इनिंग प्रदीर्घ चालेल, असे वाटत असतानाच दादांनी अकाली एक्झिट घेतली.
2014 नंतर दादांच्या तोंडी कायम माझे नाव ‘सीएम साहेब’ असेच असायचे. 2019 ला ते उपमुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्षनेता. पण, सभागृहात बोलताना ते हमखास मला ‘सीएम साहेब’ म्हणायचे. मग हळूच जीभ चावून ‘देवेंद्रजी’ म्हणायचे, असे फडणवीस यांनी लेखात म्हटले आहे.
कामाचा प्रचंड आवाका आणि त्यांच्याठायी असलेला अनुभव या अर्थाने दादा एक अतिशय मोठे नेतृत्व. सकाळी 7 वाजता दिवस सुरू करणारे दादा थांबत नसत. सरकारमध्ये असताना अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागत असतात. क्षणिक ते अप्रिय वाटत असले तरी दीर्घकालीन जनहिताचे असतात. अशा वेळी राजकीय कौशल्य पणाला लागत असते, व्यवस्थापन कौशल्यात जोखीम आणि हिंमत दोन्ही ठेवावी लागते. असे निर्णय घेण्यात पण दादा अग्रेसर असत. त्यामुळे त्यांच्यापुढे एखादी फाइल गेली किंवा विषय गेला तर दोनच उत्तरं ऐकू यायची. एकतर होकार किंवा नकार. ‘पाहतो-करतो’ ही शैली दादांना मान्यच नव्हती.
आमची मैत्री राजकारणापलीकडची होती. अवांतर विषयांवर बोलण्याची मैफील दादा सोबत असले की घडायची. आम्ही कितीदा रात्री उशिरापर्यंत गप्पा करीत बसायचो. पण, त्यातही कामाच्या विषयांची यादी त्यांची तयार असायची. कोणत्या विषयांवर बोलायचे आहे, याचा कागद हाती असायचा. धीरगंभीर विषयांवर बोलून झाले की दादांचे व्यक्तिमत्त्व खुलायचे. मग त्यांच्यातील ‘दादा’ व्यक्त व्हायचा. कुणाची आणि कशाचीच पर्वा करायची नाही, असे उत्तुंग आणि दिलखुलास दादा व्यक्त व्हायचे. त्यांच्यातील भावनाप्रधान दादा फार कमी लोकांनी पाहिला. पण, मला तेही दादा अनुभवता आले. कारण, आम्ही फार छोट्या कालखंडात पराक्रमच तेवढे केले.
कधीही वेळ न चुकवणारे दादा, या वेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली. दादा ही खंत कायम राहील, तुम्ही अकाली ‘एक्झिट’ घेतली. बारामतीजवळ बुधवारी सकाळी विमान अपघात झाल्याची बातमी कानावर आली, तेव्हाही इतके काही विपरीत घडेल, असे वाटले नव्हते. डॉक्टर जोवर काही सांगत नाहीत, तोवर कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवायला मन धजावत नव्हते. सुप्रियाताईंशी बोलणे होत होते. पण अखेर ती वाईट बातमी आलीच. माझा जवळचा, दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. कधीच विस्मरणात जाणार नाही, असा धक्का देणारा हा प्रसंग आहे, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.