Pimpri News : लोकसभा उमेदवारांची महाराष्ट्रातील दुसरी यादी भाजपने जाहीर केली. पहिल्या यादीप्रमाणे या दुसऱ्या लिस्टवरही पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीसांचीच छाप दिसून आली. त्यांनी आपले कट्टर समर्थक माळशिरसचे (जि. सोलापूर) आमदार राम सातपुते यांना सोलापूरमध्ये उमेदवारी दिली. त्यामुळे तेथील तीव्र इच्छुक पिंपरी-चिंचवडकर अमर साबळे यांचा पत्ता कट होऊन त्यांची दुसऱ्यांदा खासदार होण्याची संधी हुकली.
सातपुतेंच्या प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे याही आमदार आहेत. त्यामुळे सोलापूरची खासदारकीची लढत ही दोन आमदारांत होणार आहे. त्यात कुठल्या तरुण आमदारांचे प्रमोशन होऊन तो दिल्लीला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे. (Lok Sabha Election 2024 News)
१३ मार्चला महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली होती. त्यात पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून नाव घेतल्या जाणाऱ्या पंकजा मुंडेसह मुख्यमंत्रिपदाचे दुसरे दावेदार राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोन ओबीसी नेत्यांना नावे होती. त्यांना खासदार करून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेपासून त्यांना अलगद दूर करण्यात आले आहे.
सातपुतेंसह तीन नावांची भर भाजपच्या राज्यातील लोकसभा उमेदवारांच्या यादीत पडली. सोलापूरच्या शर्यतीत उशिरा एंट्री होऊनही सातपुतेंनी बाजी मारली. कारण फडणवीसांशी असलेली जवळकी त्यांच्या पथ्यावर पडली.
या राखीव जागेवर त्यांच्याअगोदर भाजपचे मास लीडर स्व. गोपीनाथ मुंडे समर्थक आणि माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांचे नाव घेतले जात होते. त्यासाठी ते सोलापुरात तळ ठोकून होते. त्यांनी तेथे लढण्याची जोरदार तयारीही सुरू केली होती. पण, कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदेंचे नाव आघाडीचे उमेदवार म्हणून जाहीर झाले आणि तेथेच साबळेंचा पत्ता कट झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आक्रमक, तरुण आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची लेक असलेल्या प्रणितींविरुद्ध तसाच तरुण, तगडा उमेदवार देणे युती म्हणजे भाजपला भाग होते. त्यामु्ळे त्यांनी अनुभवी पण, काहीसे नेमस्त असलेल्या साबळेंऐवजी तरुण आणि फडणवीसांचे बॅकिंग असलेल्या आक्रमक पाचपुतेंचा पर्याय निवडला. साबळेंना मुंडे समर्थक असल्याचाही फटका बसला, तर दुसरीकडे फडणवीसांचे पाठीराखे असल्याचा फायदा सातपुतेंना झाला.
आपल्याला डावलून सातपुतेंना पक्षाने संधी दिली, तरी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सातारा प्रभारी साबळे नाराज झालेले नाहीत. केंद्रात पक्षाची पुन्हा सत्ता आणून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सातपुतेच नाही, तर इतरही युतीच्या उमेदवारांचे काम करणार असून, त्यांना निवडून आणणार असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.
दरम्यान, सोलापूरची लढत ही फडणवीस (Devendra Fadanvis) आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. कारण त्यातील एकाची तेथे कन्या, तर दुसऱ्याचा शिष्यासारखा समर्थक तेथे भिडणार आहेत.
(Edited By : Sachin Waghmare )
R