Amit Shah pune tour

Amit Shah pune tour

Sarkarnama 

अमित शहांचा पुण्यातील मुक्काम कोठे? अजितदादा म्हणाले, ``माझ्या सूटमध्ये चालेल...``

पुण्यातील VVIP सर्किट हाऊसमध्ये अमित शहा (Amit Shah) दोन दिवस वास्तव्य करणार

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे पुण्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. सहकारमंत्री म्हणून त्याचा हा पहिलाच पुणे दौरा आहे. तर गृहमंत्री म्हणून ते पहिल्यांदाच पुण्यात मुक्काम करणार आहेत. शनिवारी मुंबईतून पुण्यात येणार आणि रविवारी ते पुण्यातील विविध कार्यक्रमांस हजेरी लावणार आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे.

पुण्यात `व्हीव्हीआयपी` व्यक्तींच्या मुक्कामासाठी अनेक सोयी आहेत. पण सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून यंत्रणांना विचार करावा लागतो. दुसरीकडे आपली व्यवस्था खासगी हाॅटेलमध्ये करण्याऐवजी शासकीय निवासस्थानातच करावी, अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या होत्या. त्यादृष्टीने यंत्रणांनी चाचपणी केली.

<div class="paragraphs"><p>Amit Shah pune tour</p></div>
मी मूक प्रेक्षक बनून स्वस्थ बसणार नाही : अमित शहांचा महाविकास आघाडीला थेट इशारा

पुण्यात राजभवन, व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस अशा दोन व्यवस्था आहेत. मात्र राजभवनात राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा राज्यपाल हेच मुक्कामास असतात. तेथे शहांचा मुक्काम शक्य नसल्याचे सरकारी विभागांनी स्पष्ट केले. मग व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस निश्चित करण्याचे ठरले. तेथे दोन सूट असून, त्यातील एक सूट मुख्यमंत्र्यांसाठी कायमस्वरूपी राखीव आहे, तर दुसरा सूट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात आहे. ते पुण्यात वारंवार येत असल्याने तो इतरांसाठी देण्यात येत नाही.

<div class="paragraphs"><p>Amit Shah pune tour</p></div>
महाराष्ट्रात तीनच जिल्हा बॅंका सुस्थितीत, असे का झाले : अमित शहांचा सवाल

शहा यांच्या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेचा ताफा, अनेक अधिकारी, विमान व हेलिकाॅप्टर चालक, गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी असा मोठा लवाजमा असतो. त्यांचीही एकत्रित सोय होणे गरजेचे असते. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी थेट अजितदादांनाच फोन करून याविषयी विचारले. शहा यांना सर्किट हाउसमध्ये राहण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या कानावर घातले. त्यानंतर पवार यांनी तातडीने ते राहत असलेला सूट शहा यांना उपलब्ध करून दिला.

शहा हे पुण्यात वैकुंठ मेहता सहकारी संस्थेत जाणार आहेत. तसेच पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण करणार आहे. यानिमित्ताने पुणे शहर भाजपने आगामी महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवण्यात आला आहे. या मेळाव्यात शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. शहा हे शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याची चर्चा होती. मात्र या संस्थेची भेट त्यांनी टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com