राष्ट्रवादी काँग्रसेच्या ( शरदचंद्र पवार ) 'शिवस्वराज्य यात्रे'ची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरून झाली. ही यात्रा शिरूर-हवेली मतदारसंघातील आष्टापूर येथे शुक्रवारी पोहोचली.
यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. शिरूर हवेलीचा लाल दिव्याचा बॅकलॉग भरून द्या, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली.
शिरूर-हवेली मतदारसंघातून अशोक पवार आमदार आहेत. अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अनेक आमदारांनी शरद पवारसाहेबांची साथ सोडली. मात्र, अशोक पवार शरद पवारसाहेबांबरोबर राहिले. त्यासह लोकसभा निवडणुकीतही अशोक पवार यांच्या मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना मोठं लीड मिळालं होतं.
त्यातच 'शिवस्वराज्य यात्रा' शुक्रवारी अशोक पवार यांच्या मतदारसंघात पोहोचली होती. यावेळी अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांनी अशोक पवार यांना महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्री करा, अशी थेट मागणी जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
शिरूर हवेलीचा बालेकिल्ला तुमच्या हातात सुपूर्द करत आहे. शिरूर हवेलीचा बालेकिल्ला मजबूत ठेवा, असं आवाहन खासदार कोल्हे यांनी जनतेला केलं. "बरीच वर्षे आमच्याकडे लाल दिव्याचा बॅकलॉग आहे. यंदा महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. त्यामुळे शिरूरमधील उच्चांकी विजयानंतर आमचा लाल दिव्याचा बॅकलॉग भरू द्यावा," असं खासदार कोल्हेंनी म्हटलं.
यावेळी आमदार अशोक पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "माझ्या कारखान्यासाठी 150 कोटींची मदत देण्यास तयार आहेत. पण, तिकडे पक्षात या, असं म्हणतात. मात्र, तीन महिन्यानंतर जयंत पाटील ( Jayant Patil ) आपल्यासाठी आहेत. 100 कोटी काय 300 कोटी रूपये देतील. शेवटी उद्याचे नेतृत्व हेच माणसं करणार आहेत. शरद पवारासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे," असं म्हणत अशोक पवार यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर असल्याचं सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.