Pimpri Chinchwad News : भाजपच्या आक्रमक नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तालयाने १९ कोटी रुपयांची नोटीस पाठवल्याने कारखानाच नाही, तर त्या स्वत:ही मोठ्या अडचणीत आल्या आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या राज्यभरातील समर्थकांनी आर्थिक मदतीचा ओघ सुरू केला आहे. दोन दिवसांत त्यांनी सात कोटी रुपये दिले आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील मुंडे समर्थक अद्याप शांतच आहे. (Latest Marathi News)
या कारवाईमुळे बीडसह राज्यातील मुंडे समर्थक प्रचंड आक्रमक झाले असून, जीएसटी कराची रक्कम तुमच्या तोंडावर फेकून मारू, अशी भाषा त्यांनी केली आहे. दुसरीकडे उद्योगनगरीतील त्यांचे पाठीराखे मात्र शांत आहेत. त्याबद्दल मोठी चर्चा आहे. ते कधी आपल्या नेत्यांच्या मदतीला धावून जाणार? अशी विचारणा त्यांच्याच पक्षात नंतर आलेल्या पदाधिकारी-नेत्यांमध्ये होत असल्याची कुजबूज आहे. दसरा मेळाव्यामध्ये हा मदतनिधी पंकजा मुंडे यांना देण्यात येणार असल्याचे समजते.
लोकनेते गोपीनाथ मुंडे हयात होते तेव्हापासून पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये मुंडे आणि गडकरी असे दोन गट होते. मुंडेंच्या अकाली निधनाने ही गटबाजी कमी झाली. नंतर या गटाची सूत्रे आपोआप पंकजा मुंडेंकडे आली. दरम्यान, पिंपरी महापालिकेत २०१७ ला प्रथमच भाजप सत्तेत आला. त्यावेळी एका मुंडे समर्थकाने थेट पंकजांची भेट घेऊन पालिकेत मोठे पदाधिकारी पद मिळवले. त्याचा कित्ता नंतर व गोपीनाथ मुंडे असतानाही अनेकांनी गिरवला होता.
एका समर्थकाची राज्यसभेत, तर दुसऱ्याची विधान परिषदेवर वर्णी लागली. काहींना महामंडळे मिळाली. मागील टर्मलाही काही मुंडे समर्थक नगरसेवक होते. त्यातील एक उपमहापौर झाले. असे असूनही अद्याप त्यांच्याकडून अडचणीत सापडलेल्या त्यांच्या महिला नेत्याच्या मदतीसाठी ओघ सुरू झालेला नाही.
पंकजाताईंना आम्ही निश्चित मदत करू, असे त्यांच्या एका समर्थकाने सांगितले. मात्र, राज्यातील सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती आणि पंकजाताईंची सध्याची मनस्थिती विचारात घेता त्या दुसऱ्या पक्षात गेल्या, तर आमची अवस्था ना घर का-ना घाट का अशी होईल, अशी भीती त्याने व्यक्त केली. त्याचवेळी पंकजाताई पक्ष सोडणार नाहीत, असेही नेते म्हणतात.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे समर्थकांची ताकद शहरात कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्याला पकंजांच्या झालेल्या शहर दौऱ्यातून दुजोरा मिळाला. त्यांचे जंगी म्हणावे असे स्वागत झालेच नाही. फ्लेक्स झळकले नाहीत, तर त्यानंतर नुकत्याच त्यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे या शहरात येऊन गेल्या. पण, त्याचीही चर्चा झाली नाही. मुंडे समर्थकांऐवजी दुसऱ्याच भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी त्यांनी भेट दिली होती.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.