शिक्रापूर : वाबळेवाडी (Wablewadi) आंतरराष्ट्रीय शाळा (ता.शिरूर, जि. पुणे) येथील प्रभारी मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे निलंबनाने प्रशासन आणि वाबळेवाडीकर असा मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. या प्रकरणाला राजकीय कंगोरेही आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) हे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास शाळेत दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाचा निकाल तीन दिवसात लावतो, असे सांगितले.
''वारे गुरुजी आणि वाबळेवाडीकर, देशात आदर्श अशी शाळा उभी करुन तुम्ही प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढा उभा केला आहे. आता सत्ता सुध्दा सत्याला थांबवू शकत नाही, वाबळेवाडीकर आणि वारे गुरुजी तुम्हाला न्याय मिळेल. ''वाबळेवाडी शाळा प्रकरणाची मी १३ तारखेला ऑनलाईन सुनावणी घेईन आणि त्याच दिवशी या प्रकरणाचा निकालही मी लावीन, काळजी करु नका,'' असे कडू म्हणाले.
बच्चू कडू हे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास शाळेत दाखल झाले. कारवाई निषेधार्थ सध्या शाळेत जात नसलेले ५२१ विद्यार्थी, त्यांचे सर्व पालक, संपूर्ण वाबळेवाडीकर ग्रामस्थ शाळा प्रांगणात जमा झाले. रात्रीच्या एक वाजता एवढी गर्दी पाहून बच्चु कडूही आचंबीत झाले. त्यांनी काही विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक व शिक्षक यांची मनोगते ऐकून घेतली. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी या प्रकरणात उडी घेवून या संपूर्ण प्रकरणाला राजकारणापासून दूर ठेवण्याची गरज व्यक्त करीत कडू यांना वस्तुस्थितीची माहिती दिली.
कडू म्हणाले, ''मी या शाळेत तिस-यांदा येतोय. एकदा तर तार कंपाऊंडवरुन उडी मारुन शाळा पाहून गेलोय. या संपूर्ण प्रकरणाची मी माहिती घेतलेली आहे. या शाळा किंवा वारे सर यांच्याबद्दल तक्रार करणाऱ्यांना त्यांची एकच चुक दिसते मात्र त्यांची ९९ कामे दिसत नाहीत, त्यांच्या डोळ्यालाच काहीतरी झालेले आहे. वारे चुकले की, त्यांचे तक्रारदार हेही मी दाखवून देईन. एकतर आपल्या देशात धार्मिक आणि लग्नकार्यांसाठी लोक एकत्र येतात पण शाळांसाठी एकत्र येत नाहीत,''
''वाबळेवाडी शाळा म्हणजे शाळेसाठी एकत्र येवून मोठे काम उभे केल्याचे राज्यातच नाही तर देशातील एक उदाहरण आहे. सध्या आपली लढाई व्यवस्थेच्या विरोधात आहे, हा सामाजिक लढा असल्याने या लढ्यात मी तुमच्या सोबत आहे. शाळेतील आबालवृध्दांचे डोळे आणि चेहरेच सगळ सांगून जाताहेत. पर्यायाने मी याच खात्याचा राज्यमंत्री आहे, राज्यमंत्रीपदाचा वापर मी वाबळेवाडी शाळेच्या भल्यासाठी करेन एवढेच सांगतो आणि या शाळेच्या प्रकरणी मी १३ तारखेला ऑनलाईन सुनावणी घेईन आणि त्याच दिवशी या प्रकरणाचा निकालही मी लावीन. फक्त काळजी करु नका,'' असे कडू म्हणाले. कडू यांनी रात्री सव्वा दोन वाजता वाबळेवाडीतून रवाना झाले. सूत्रसंचालन सतीश वाबळे यांनी केले. निवृत्त केंद्रप्रमुख रत्नमाला मोरे यांनी आभार मानले.
सुर्यकांत पलांडेंकडून जोरदार समर्थन..!
शाळा एका विशिष्ठ पक्षाची असल्याचा संभ्रम तक्रारदारांकडून केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुर्यकांत पलांडे तब्बल सहा तास शाळेत पालकांसमवेत मंत्री कडू यांच्या प्रतिक्षेत थांबले. पलांडे यांनी स्वत: शाळेच्या वतीने प्रवक्ता म्हणून भूमिका हातात घेत कडू यांना वस्तुस्थिती सांगितली. शाळेंच्या बाबतीत असे होऊ लागले तर शिक्षण आणि शिक्षकांच्या क्षेत्रात चुकीचा संदेश जाईल याबाबत मंत्री महोदयांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.