Baramati जिंकण्यासाठी दोन वर्षे अगोदरच भाजपची मोर्चेबांधणी ; मताधिक्याची कोंडी फोडणे आव्हानात्मक!

Baramati : वरिष्ठ नेतृत्वाच्या पालख्या बारामतीच्या राजकीय पंढरीत विसविल्या, तरी बारामतीत जनता रुपी पांडूरंग प्रसन्न होण्यासाठी बारामतीत सर्वसमावेशक शाश्वत चेहरा उमेदवार म्हणून कार्यरत करणे गरजेचे आहे.
Baramati Lok Sabha Constituency
Baramati Lok Sabha Constituency sarkarnama

माळेगाव : बारामती लोकसभा मतदार संघाची तयारीसाठी भाजपच्या नेत्या व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman)या येत आहेत. त्या पार्श्वभूमीवरची पुर्व तयारीसाठी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मंगळवारी (ता. ६) रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत.

भाजपाची या मतदार संघात आजवरची वाटचाल विचारात घेता भाजपने कंबर कसली आहे. २०२४मध्ये बारामती जिंकण्यासाठी भाजपने दोन वर्षे अगोदर मोर्चेबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच अर्थ दिल्ली, मुंबईच्या भाजप नेतृत्वाची करडी नजर बारामती लोकसभा मतदार संघाकडे वळली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात सन २०१४, २०१९ मधील निवडणुकीतील मतदानांची आकडेवारी विचारात घेता येथे निवडणूक लक्षवेधी झाल्याची नोंद आहे. २०१४ ला राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (भाजप पुरस्कृत) आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लढत झाली होती.

Baramati Lok Sabha Constituency
Nirmala Sitharaman : अमेठीच्या करेट कार्यक्रमानंतर आता भाजपचे टार्गेट बारामती

जानकरांचा जरी पराभव झाला असला तरी त्यांनी लक्षणीय अशी ४ लाख ५१ हजार मते आपल्याकडे खेचली होती. त्यावेळी अवघ्या ६९ हजार मतांनी सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. त्यावेळी मोदी लाटेचा त्यांना प्रचंड फायदा झाला होता.

२०१९ मध्ये भाजपच्या तिकीटावर दौंडच्या कांचन कुल यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध लढत दिली होती. त्यावेळी पराभूत कुल यांना ५ लाख ३० हजार मते मिळाली, तर सुळे यांना ६ लाख ८४ हजार मते मिळाली. त्या लढतीत सुळे यांनी १ लाख ५३ हजार मते मिळवत विजयी खेचला होता. याचा विचार करता २०१४ पेक्षा २०१९ च्या निवडणूकीत भाजपाची मते वाढूनही विजयामधील अंतर अधिकचे राहिले होते.

या दोन्ही निवडणूकीत खडकवासला विधानसभा मतदार संघात ६० हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य भाजपला मिळाली होते, तर दौंड विधान सभा क्षेत्रामध्ये २०१४ ला २८ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. परंतु २०१९ ला कुल या स्थानिक उमेदवार असतानाही अवघ्या ८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते.

पुरंदरमध्ये भाजप उमेदवारांना २०१४ ला ५ हजाराचे मताधिक्य मिळाले, मात्र २०१९ ला ५ हजार मतांची पिछाडीवर होते. याचवेळी भोर आणि इंदापूर तालुक्यात दोन्ही निवडणूकात २० हजारांच्या आसपास मताधिक्य खासदार सुळेंना मिळाले होते. त्यात लक्षणीय भर पडली ती बारामती तालुक्यातील मताधिक्याची.

२०१४ ला ९० हजार, तर २०१९ ला १ लाख २७ हजार मतांचे निर्णयाक मताधिक्य मिळवित सुळे यांनी विजयी खेचून आणला होता. भाजपच्या दृष्टीने या प्रतिकूल स्थितीचा विचार करता आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमधील राष्ट्रवादीच्या मताधिक्याचे समीकरण सोडविणे आव्हानात्मक आहे.

सहकारात राष्ट्रवादीचे प्राबल्य

अर्थात ते मताधिक्याचे समिकरण न सुटण्यामागची काही कारणे प्रखरशाने पुढे येतात. त्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेतृत्व आणि पवार कुटुंबियांमध्ये असलेली जवळीक, बारामतीत भाजपचे कमकुवत संघटन, स्थानिक एकनिष्ठ चेहरा संधी न देणे, निवडणूक पुरतीच रणनीती अवलंबने, मोदी व फडणवीस सरकारच्या यशस्वी योजना जनतेपर्य़ंत पोचवण्याची व्यवस्था नसणे, बाहेरचे उमेदवार लादणे व ऐनवेळी उमेदवार निश्चित करणे, सहकारात राष्ट्रवादीचे प्राबल्य असणे, बारामतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकात ४८ टक्के मतदान मिळूनसुद्धा स्थानिक नेतृत्वाला भाजपकडून बळ न मिळणे.

बारामतीच्या मताधिक्याची कोंडी फोडणे आव्हानात्मक...!

बारामतीमधील मिळणाऱ्या मताधिक्याचा विचार करता ही कोंडी भाजप कशी फोडते, यावर संपुर्ण बारामती लोकसभा विजयाचे समीकरण अवलंबून असणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली व मुंबईचे वरिष्ठ नेतृत्वाच्या पालख्या बारामतीच्या राजकीय पंढरीत विसविल्या, तरी बारामतीत जनता रुपी पांडूरंग प्रसन्न होण्यासाठी बारामतीत सर्वसमावेशक व पक्षाशी एकनिष्ठ असणारा शाश्वत चेहरा उमेदवार म्हणून कार्यरत करणे गरजेचे आहे. अन्यथा लढत चुरशी आणि निकाल मात्र बारामतीकरांच्या बाजूने, असेच घडल्याशिवाय राहणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com