

BJP News : ऊरळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात हडपसरमधील फुरसुंगी भागात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या मुलासह दोघांना मद्य वाहतूक करताना पकडण्यात आले. या कारवाईत मद्याच्या बाटल्यासह मोटार असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या पथकाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी वेदांत राहुल कामठे (वय १९), आकाश तुकाराम मुंडे (वय २४, दोघे रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सुहास गवळी (वय ३६, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत कामठे हा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल कामठे यांचा मुलगा आहे. गवळी हे निवडणूक आयोगाच्या पथकात नियुक्तीस आहेत. निवडणूक काळात या पथकाकडून आचारसंहिता पालन, तसेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. सोमवारी रात्री फुरसुंगी परिसरात तपासणी नाक्यावर गवळी नियुक्तीस होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून फुरसुंगीकडे भरधाव कार निघाली होती. ती कार तपासणीसाठी थांबवली असता त्यात मद्याच्या बाटल्या सापडल्या.
मद्याच्या बाटल्यांबाबत पथकातील कर्मचाऱ्यांनी विचारणा केली. तेव्हा दोघांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. बेकायदा मद्य वाहतुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले, या प्रकरणी आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटारीसह मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.