Shirur News : आम्ही महादेव जानकरांना मंत्री केले, असे भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणत असतील तर माझ्यावर त्यांनी उपकार केले नाहीत. मी त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री केला; म्हणून त्यांनी मला मंत्री केले, असा टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजपला लगावला. (BJP did not do me a favor by making me a minister : Mahadev Jankar)
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ती यात्रा शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे महादेव जानकर यांची सभा झाली. त्या सभेत जानकर बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्ष देशातील सर्वसामान्य लोकांना लुटण्याचे काम करीत आहेत. काही जण पोरी, पुतण्या आणि मुलांसाठी पक्ष चालवत आहेत. मला बायको नाही, पोरं नाहीत, त्यामुळे इतर राजकीय नेत्यांप्रमाणे भ्रष्टाचार आणि चोरीचा विषय माझ्याकडे नाही.
माझ्या पक्षाकडून सर्वसामान्यांची कामे होत आहेत, त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचा जनाधार वाढत आहे. राष्ट्रीय समाज पक्षात सर्व जाती धर्माच्या लोकांना स्थान देण्यात आलेले आहे. त्यामुळे आमचा पक्ष पुढे चालला आहे. देशातील चार राज्यांत रासपला मान्यता मिळाली असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. येत्या निवडणुकांत रासपला चांगले यश मिळेल, असा दावाही जानक यांनी केला. ते म्हणाले की, गेल्या ७० वर्षांत मराठा समाजाचे अनेक नेते मुख्यमंत्री झाले. मंत्री, आमदार, खासदार झाले. मात्र, त्यांनी मराठा समाजाला गेल्या ७० वर्षांत आरक्षण दिले नाही. आरक्षणासाठी मराठा समाजाला उपोषण करावं लागतं, रॅली काढवी लागते, हे क्लेषदायक आहे, असेही जानकर म्हणाले.
या वेळी रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील पाल, प्रभाकर जांभळकर, भाऊसाहेब धायगुडे, तात्यासाहेब टेळे, रवींद्र मखर, आबासाहेब ठोंबरे, गोकुळ पिंगळे, सपना मलगुंडे उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण बिडगर, तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे, भरत गडधे, माऊली सलगर, सुवर्णा जराड, सुनीता किरवे, चेतना पिंगळे, ॲड. रतन पाडुंळे यांची भाषणे झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.