पिंपरी : काळा पैसा मनी लॉंड्रिंगच्या बेकायदेशीर मार्गाने पांढरा करून घेण्यात शिवसेनेचे यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही मागे टाकले आहे. त्यांच्या परिवाराचा घोटाळा आता चारशे कोटीच्या घरात गेला आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शनिवारी (ता.५) केला. उदय महावार या हवाला ऑपरेटरमार्फत जाधव यांनी कोट्यवधीचा काळा पैसा पांढरा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.
आयकर विभागाने जाधव परिवाराचे चारशे कोटींहून अधिक व्यवहाराचे घोटाळे बाहेर काढले असून आता कंपनी व्यवहार मंत्रालयाने आपली कारवाई सुरु केली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली. जाधवांच्या जोडीने भुजबळ आणि गांधी परिवारावर त्यांनी पुन्हा मनी लॉंड्रिंगचा आरोप केला. जाधव यांचे काळ्याचा पांढरा पैसा केलेल्या महावार यानेच गांधी परिवाराच्या नॅशनल हेरॉल्ड कंपनीला अशी मदत केली होती, असे ते म्हणाले. जाधवांनी एक रुपयांचा शेअर पाचशेला विकून कमाल केली असल्याचे त्यांनी सांगितले. जाधव परिवाराचा काळा पैसा पांढरा करण्यात एक आयएएस अधिकारी गुंतला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. हा काळा पैसा पांढरा कसा केला हे सांगताना त्यांनी २० मार्च २०२० रोजी स्थापन झालेल्या प्रधान डिलर्स कंपनीचे उदाहरण केले.
स्थापनेनंतर दहा दिवसांतच या कंपनीचा एक रुपयाचा एक शेअर महावार याच्या कोलकत्ता येथील सहा बोगस, शेल कंपन्यांनी पाचशे रुपयांना विकत घेतला. तीन लाख रुपयांचे शेअर्स १५ कोटी रुपयांना विकत घेण्यात आले. म्हणजे जाधव यांचे काळे १५ कोटी रुपये फक्त तीन लाख रुपयांत पांढरे झाले. कालांतराने हे १५ कोटी जाधव परिवाराला हस्तांतरित करण्यात आले. तर, दुसऱ्याच वर्षी प्रधान कंपनीची मालकीच जाधव परिवाराकडे फक्त काही लाख रुपयांत हस्तांतरित करण्यात आली, असे ते म्हणाले. भुजबळ यांनीही २०१२-१३ मध्ये आर्मस्ट्रॉंग एनर्जी कंपनीत अशाच पद्धतीने शंभर रुपयांचा शेअर दहा हजार रुपयांना कोलकत्याच्याच कंपन्यांना दिला होता, असा आरोपही सोमय्यांनी केला.
पाचशे कोटींच्या मनी लॉंड्रिंगमधील पैसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीकडे गेल्याचा खळबळजनक आरोप सोमय्यांनी केला. शिवसेना नेते संजय राऊत हे दारूच्या बिझनेसमध्ये पार्टनर असून त्यांची सुजीत पाटकर यांच्याबरोबर बोगस कंपनी असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याबाबत तक्रार करूनही मुंबई पोलिसांनी (मरीन लाईन्स पोलिस ठाणे) गुन्हा दाखल केला नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे केंद्र सरकारच्या कंपनी मंत्रालयाने त्याची दखल घेत गुन्हा नोंदवला असून कंपनी मालकाला मंगळवारी चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.