Pune News : कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असा निर्धार बालवडकर यांनी केला होता. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली होती. मात्र बालवडकरांचे बंड शमवण्यात भाजपच्या नेत्यांना यश आल्याचं पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अमोल बालवडकर हे भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र बालवडकर यांना तिकीट नाकारत भाजपने पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यानंतर अमोल बालवडकर यांनी बंडाचे निशाण फडकवत आपण निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांच्या घरी जाऊन देखील भेट घेतली होती. मात्र त्यानंतर देखील बालवडकर हे निवडणूक लढण्यावर ठाम होते.
मात्र आता अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांचे बंड आता थंड झाले असून त्यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन पेढा भरवत नाराजी दूर झाल्या असल्याचे सांगितले आहे. चंद्रकांत पाटील यांना आतापर्यंतच्या सर्वाधिक मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची आपली जबाबदारी असल्याचे देखील सूतोवाच बालवडकर यांनी केले आहे.
कोथरूडमध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate) यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे तर मनसेकडून किशोर शिंदे कोथरूड पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत आहेत.