पिंपरी : कसबापेठ (पुणे) आणि चिंचवड (Chinchwad By-Election) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका तेथील आमदारांच्या निधनामुळे आता जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपकडून (BJP) सर्वोच्च पातळीवरून निकराचे प्रयत्न सुरु आहेत, तर त्या तशा न होण्यावर व बिनविरोध न करण्यावर दुसरीकडे महाविकास आघाडी आग्रही आहे.
आमदाराचे निधन झाल्यानंतर त्या ठिकाणची निवडणूक ही बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा असल्याचा दाखला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. मात्र, या टर्ममधील निधन झालेल्या चार आमदारांच्या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिले होते.
एका ठिकाणचा (अंधेरी पूर्व) त्यांनी शेवटच्या क्षणी मागे घेतला. तर, इतर तीन जागा (पंढरपूर, देगलूर, कोल्हापूर) लढवून त्यातील आघाडीची एक जागाही भाजपने जिंकली आहे. हीच बाब महाविकास आघाडीला खुपते आहे. त्यामुळे आता कसबाच नाही, तर चिंचवडच्याही निवडणुकीत बाय न देण्याचे आघाडीने ठरवले आहे. म्हणून ही निवडणूक लढण्याचा अजित पवार, नाना पटोले, संजय़ राऊत या आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा मानस आहे.
वरील दोन्ही निवडणुका बिनविरोध न करण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत. रखडलेल्या व आता कधीही होऊ शकतील अशा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका हे त्यामागील मुख्य कारण आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे.
आघाडीतील तिन्ही पक्षांना आपापली ताकद यातून पारखून घेता येणार आहे. म्हणूनच ते तिन्ही पक्ष ती लढविण्यासाठी आग्रही आहेत. म्हणूनच उद्योगनगरीत एकही नगरसेवक नसलेल्या व दोन गटांमुळे शहरात तोळामासा प्रकृती झालेल्या कॉंग्रेसनेही आगामी पालिका निवडणूक ध्यानात घेऊन, आपली शहरातील ताकद आजमावण्याकरिता चिंचवडची जागा लढविण्याचे रणशिंग फुंकले आहे. त्याप्रमाणेच दुभंगलेल्या शिवसेनेलाही पालिका निवडणुकीनिमित्तच आपली शहरातील ताकद जोखायची असल्याने, त्यांनीही चिंचवड लढण्याचा इरादा जाहीर केला आहे.
तर, गतवेळी २०१७ ला आपल्या हातातून प्रथमच भाजपने हिसकावून घेतलेली पिंपरी पालिकेतील सत्ता पुन्हा मिळविण्याच्या उद्देशातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला या पोटनिवडणुकीत विजयी होऊन पहिले पाऊल टाकायचे आहे. तसेच पंढरपूरच्या पोटनिवडणुकीतून भावनेची लाट चालत नाही, याचा प्रत्यय आल्याने आघाडीला हा चान्स घ्यायचा आहे. ही संधी दडवायची नाही. जर, विजय मिळाला, तर त्यातून त्यांच्यासाठी दोन्ही जुळ्या शहरांच्या महापालिका निवडणुकीत चांगला संदेश जाणार आहे. तसेच पक्षालाही मोठा बूस्टर डोस मिळणार आहे.
दुसरीकडे या निवडणुकीत एका जागेवर, जरी पराभव झाला, तरी त्यातून जनमानसात नकारात्मक संदेश भाजपच्या दृष्टीने जाणार आहे. त्यातून या दोन्ही महापालिकांत पुन्हा सत्तेत येण्याचा त्यांचा मार्ग काहीसा अवघड होणार आहे. त्यामुळेच भाजपकडून अगदी सर्वोच्च पातळीवर या दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याचे निकराचे प्रयत्न सुरु झालेले आहेत. मात्र, ते यशस्वी होतील, अशी चिन्हे अजिबात नाहीत.
एकवेळ आघा़डीने उमेदवार नाही दिला, तरी या दोन्ही ठिकाणी अपक्षांसह इतर लहान राजकीय पक्ष निवडणूक लढण्य़ाची आपली हौस ही भागवून घेणार आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्वप्रमाणे येथेही मतदान होणारच यात शंका नाही. दरम्यान, या टर्ममध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका होत असताना राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या, मात्र त्या राज्यात बिनविरोध होत आहेत, हे विशेष.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.