Malegaon News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचा धनगर समाज बांधवांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बारामतीत निमंत्रीत करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून याबाबतचा तसा पत्रव्यवहारही झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते विश्वास देवकाते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यामुळे आगामी निवडणुकींचा विचार करता आणि कर्नाटकात झालेल्या परिवर्तनाची घौडदौड महाराष्ट्रात होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बारामतीत आणण्याचा प्रयत्न आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती चौंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरी झाली. तर आता बारामतीमध्येही अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होण्यासाठी येथील अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते विश्वास देवकाते यांच्यासह अनेकांनी शरद पवार यांच्याकडे आग्रह धरला आहे.
भाजपला चारीमुंड्या चित करून कर्नाटकचे मुख्यमंत्री झालेले आणि धनगर समाजाचे नेते व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बारामतीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांच्यासमवेत एक बैठक पार पडली. तसेच रविवारी (ता.४) बारामतीत अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान सभागृहात धनगर समाज बांधवांचीही बैठक झाली.
या पार्श्वभूमीवर बोलताना देवकाते म्हणाले, "महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे. त्यांना न्याय देण्याचं काम कोणी केले असेल तर ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. पण भाजपच्या नेतेमंडळींनी धनगर समाज आमच्याबरोबर आहे, असं जे चित्र निर्माण करण्याचा प्रय़त्न केला, तो चुकीचा आहे".
"नगर जिल्ह्यासह बारामतीच्या मेडीकल कॉलेजला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव शिंदे-फडणवीस सरकारने दिले त्यांचे आम्ही स्वागत करतो. पण कोट्यवधी रुपये मंजूर करून जे बारामती मेडीकल कॉलेज उभारले गेले, ते केवळ अजित पवार यांच्या परिश्रमामुळेच", असं देवकाते म्हणाले.
सिद्धरामय्यांना बारामतीत आणण्यामागे उद्देश काय?
"कर्नाटक राज्यापासून आता परिर्वतनाची लाट सुरू झाली आहे. भाजपवाले खोटी आश्वासने देत आहेत. तसेच विविध प्रकारचे भीतीदायक वातावरण तयार करून सत्ता बळकाविण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोकांनी ओळखलं आहे. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये झालेल्या परिवर्तनाची घौडदौड महाराष्ट्रात बारामतीपासून होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बारामतीत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे", असं देवकाते यांनी सांगितलं.
Edited By-Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.