बारामती शहर : विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना प्रत्यक्ष प्रचारासाठी अत्यंत कमी दिवस मिळणार असल्याने सर्व मतदारापर्यंत कसे पोहोचायचे या बाबत सर्वांनाच चिंता वाटत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत 27 सप्टेंबरपासून असली तरी घटस्थापनेपर्यंत म्हणजे 29 सप्टेंबरपर्यंत कोणी अर्ज दाखल करतील अशी शक्यता धूसर आहे. पितृपंधरवडा संपल्यावर म्हणजेच 30 सप्टेंबरपासूनच या प्रक्रीयेला प्रारंभ होईल.
उमेदवारी अर्ज दाखल करायची अंतीम तारिख 4 ऑक्टोंबर आहे. उमेदवारांचा अर्ज भरणे, प्रतिज्ञापत्रके, संपत्तीचे विवरण याची गोळाबेरीज करुन अर्ज दाखल करेपर्यंत हा काळ निघून जाईल. 7 ऑक्टोबरला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशी प्रत्येक मतदारसंघाचे नेमके चित्र स्पष्ट होईल व त्या दिवसापासून ख-या अर्थाने प्रचाराला प्रारंभ होणार आहे.
यातही 8 ऑक्टोबरला दसरा असल्याने त्या दिवशी प्रचार शक्य होणार नाही. 12 ऑक्टोबरला दुसरा शनिवार व 13 ऑक्टोबरला रविवार असल्याने शहरी भागात सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने प्रचार काहीसा थंडावणार हे उघड आहे. 21 ऑक्टोबरला मतदान असल्याने 48 तास अगोदर प्रचाराच्या तोफा थंडावणार म्हणजे 19 ऑक्टोंबरला संध्याकाळी जाहीर प्रचार थंडावणार.
याचाच अर्थ 4 ते 19 ऑक्टोबर असे अवघे 15 दिवसच जाहीर प्रचाराला मिळणार आहेत.
यातही प्रचार हा दिवसातील काही ठराविक तासच शक्य होतो. रात्री दहा नंतर प्रचार करता येत नाही आणि सकाळी लवकर प्रचाराला गेले तर माणसं येत नाहीत, ही डोकेदुखी सर्वच राजकीय पक्षांपुढे आहे. यातही ग्रामीण भागात लोकांचे कामाचे तास व शहरी भागात सुटीचे दिवस सोडूनच प्रचार करावा लागत असल्याने तेथेही राजकीय पक्षांना कमालीच्या मर्यादा येतात. प्रचाराला पंधराच दिवस मिळणार असले तरी त्यातही तासांचा हिशेब केला तर प्रभावी प्रचाराला दहाच दिवस मिळतील अशी चिन्हे आहेत.
ऐनवेळेस उमेदवारी मिळणा-यांची होणार पळापळ....
ज्या उमेदवाराचे नाव शेवटच्या क्षणी जाहीर होईल, त्यांना तर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अक्षरशः पळापळच करावी लागेल. कारण दहा बारा दिवसात किती मतदारांपर्यंत पोहोचायचे हा प्रश्न राज्यातील सर्वच मतदारसंघात उभा राहणार आहे. यातही पावसाने साथ दिली तर प्रचार सुरळीत पार पडेल, वरुणराजा नेमका या काळात बरसला तर प्रचारावरही त्याचा परिणाम जाणवू शकेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.