सुभेदारी की पक्ष: राष्ट्रवादीसमोर आव्हान

 सुभेदारी की पक्ष: राष्ट्रवादीसमोर आव्हान

शिरूरमध्ये शिवसेनेतून आलेल्या डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी, मावळमधून पार्थ पवार, सांगलीच्या जागेची स्वाभिमानी शेतकरी पक्षाने केलेली मागणी आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे पक्षांतर या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या दोन दशकांत बांधणी कशाची केली, हा प्रश्न पडतो. शेती आणि रोजगार या दोन्ही प्रश्नांवर भाजप-शिवसेना युती सरकारला झोडपण्याची संधी असताना पक्षाला प्रचाराच्या मुद्दयांऐवजी उमेदवार शोधण्यात आणि सुभेदारांना सांभाळण्यात वेळ द्यावा लागतो आहे, हे विसरता येणार नाही.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नगर या सहा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य आहे. या जिल्ह्यांमध्ये गेल्या पाच वर्षांत भाजप-शिवसेना युतीने जोरदार आगेकूच केली; ती प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलेल्या उमेदवार आणि नेत्यांच्या बळावर. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी किती नेते शिल्लक आहेत, हे आजमाविण्याची वेळ आहे.

पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या बारा आणि विधानसभेच्या ७० जागा आहेत. लोकसभेच्या बारापैकी प्रत्येकी चार जागा भाजप आणि राष्ट्रवादीच्या आहेत. शिवसेनेकडे तीन आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानकडे त्यांची स्वतःची एक असे विभाजन आहे. विधानसभेवर भाजपच्या २४ सदस्यांपाठोपाठ राष्ट्रवादीचे 19 सदस्यांचे बळ आहे. त्यानंतर शिवसेना (१३), काँग्रेस (१०) आणि अन्य पक्ष येतात. भाजपच्या २४ पैकी निम्म्याहून अधिक जागांवर पक्षांतर करून आलेली मंडळी विराजमान आहेत. यातीलही बहुतांश हे मुळचे सहकारातील सुभेदार आहेत.

जिल्हा बँका, कारखाने, शिक्षण संस्था, पतपेढ्या अशी सहकाराची उतरंड अडचणीत आहे. या उतरंडीला सावरण्यासाठी सत्तेभोवती राहणे या सुभेदारांची गरज आहे. पक्ष दुय्यम; सुभेदारी अव्वल हा त्यांचा खाक्या आहे. हे ओळखून भाजपने गेल्या पाच वर्षांत 'इन-कमिंग'चा सपाटा लावला. विशेषतः भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या नेत्यांना गळ लावून बसले. त्याचा एक परिणाम असा झाला, की या नेत्यांची स्थानिक आणि एकूण पक्ष म्हणून विश्वासार्ह्यता कायम संशयास्पद राहिली. आज राष्ट्रवादीत आहेत; उद्या असतील की नाही माहिती नाही, अशी त्यांची अवस्था करून ठेवली. या संशयास्पद वातावरणाचा फटका राष्ट्रवादीला जाणवत नसेल, तरच आश्चर्य.

महाराष्ट्राच्या अन्य भागाच्या तुलनेने मुळातच पश्चिम महाराष्ट्र शेती, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आघाडीवर विकसित आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचे त्यामध्ये योगदान आहे. या तिन्ही नेत्यांनी सहकाराच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राला अग्रेसर बनविले. सहकार आणि सत्ताकेंद्रित राजकारण हातात हात घालून चालले. याचे साईड इफेक्टस् म्हणून सहकार क्षेत्रातील सुभेदार निर्माण झाले. १९९९ च्या काँग्रेसमध्ये सहकार क्षेत्राला आश्वस्त करेल, असे दमदार नेतृत्व नसल्याने हे सुभेदार राष्ट्रवादी सोबत आले. परिणामी, राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रात ताकदवान पक्ष ठरला.

या वीस वर्षांत पक्षाने सुभेदारांनाच बळ दिले आणि त्यांच्या सुभेदाऱया अधिकाधिक भक्कम करण्याच्या वाटा खुल्या केल्या. त्या वाटांमध्ये कारखान्यांना पॅकेज ते सत्तेशी सतत जवळीक असे सारे मार्ग वापरले. कार्यकर्त्यांचे नेटवर्क, त्यांची बांधणी ही पवारांची 'स्ट्रेंथ'. पक्षात ती 'स्ट्रेंथ' अपवादात्मकच दिसली. त्यामुळं सुभेदारांचे नेटवर्क आणि त्यांच्या पिढ्यांचीच बांधणी पक्षात झाली.

वीस वर्षांत सहकार क्षेत्राची पुरेशी वाट लागली आहे. साखर कारखान्यांभोवती विणलेले सहकाराचे जाळे कमकुवत आहे. त्यामुळे सहकाराच्या सुभेदारांनी वारे ओळखून भाजपचा तीर गाठला. केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचा लंबक जसा झुलत राहिला, तसे भाजपमध्ये दाखल झालेले सुभेदार सत्तेला पकडून झुलत राहिले. आता उर्वरित सुभेदारांना सत्तेचा लंबक पकडायचा आहे आणि तिच राष्ट्रवादीच्या वाटचालीची कसोटी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com