Pimpri-Chinchwad News : सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी नुकताच (ता.२१) विधानसभेत कचरा कर रद्द करण्यावरून रुद्रावतार धारण केला होता. त्यानंतर या कराला राज्य सरकारने लगेच तात्पुरती का होईना स्थगिती दिली. त्यानंतर चिंचवडच्या भाजपच्याच नवीन आमदार अश्विनी जगताप यांनीही औचित्याच्या मुद्याव्दारे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला भेडसावणाऱ्या मुलभूत समस्यांकडे सभागृहाचे आज (ता.२५) लक्ष वेधले. आता फक्त पिंपरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) बोलायचे बाकी राहिले आहेत.
यावर्षी ९ मार्चला आमदारकीची शपथ घेतलेल्या अश्विनी जगतापांनी त्याच महिन्यात राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात अर्थसंकल्पीय अनुदानावरील चर्चेत भाग घेत आपल्या कामाचा ठसा उमटवला. तो पावसाळी अधिवेशनातही त्यांनी कायम ठेवला. काल (ता.२४) विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत त्या सहभागी झाल्या. चिंचवड मतदारसंघातील ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत भागातील रस्ते, पाणी, ड्रेनेजसाठी निधीची मागणी त्यांनी केली.
हिंजवडी, माण, मारुंजे, गहूजे, जांबे, नेरे आदी गावांच्या रस्त्यांसाठीही तो मागितला. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) विश्रामगृह बांधण्याकरता वाढीव निधीची मागणीही केली. तर, औचित्याच्या मुद्याव्दारे पिंपरी-चिंचवड पोलीस (Police) आयुक्तालयाला भेडसावणाऱ्या मुलभूत सोई सुविधांकडे सभागृहाचे आणि सरकारचेही लक्ष आज त्यांनी वेधले. पाच वर्षाच्या स्थापनेनंतरही पोलीस आयुक्तालय हे भाड्याच्या अपुऱ्या जागेत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
आयुक्तालय आणि मुख्यालयाच्या जागेचा गेल्या तीन वर्षापासून राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शहरात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर झालेला असल्याने आयुक्तालयाला सोयीसुविधा तातडीने पुरविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
१५ ऑगस्ट २०१८ ला सुरु झालेले पिंपरीचे पोलीस आयुक्तालय हे पिंपरी महापालिकेच्या अपुऱ्या अशा शाळेच्या इमारतीत भाड्याच्या जागेत आहे. तर, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, लेखा शाखा आदी शाखांचे कामकाज शहरातील विविध ठिकाणी भाडेतत्त्वावर घेतलेल्या अपुऱ्या जागेमध्ये सुरु आहे. आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी, तर जागाच नाही.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.