केडगाव (जि. पुणे) : दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले. ही आत्महत्या नसून हत्या (murder) असल्याचे पुढे आले आहे. एकाच कुटुंबातील सात मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली असून संवेदनशील मने हळहळली आहेत. नेहमी अशाच स्वरूपाचे काम करणारे अग्निशमन पथकही (Fire Brigade) चिमुकल्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढताना हेलावून गेले हेाते. वाघोली येथील पीएमआरडीएच्या (PMRDA) अग्निशमन पथकातील प्रकाश मदने यांनी त्याबाबतची भावना बोलून दाखवली. (Fire Brigade was shocked to see the bodies of children)
पारगाव येथील भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले. चार मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले होते. मात्र, तीन चिमुकल्यांचे मृतदेह सापडत नव्हते. त्या चिमुकल्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ‘पीएमआरडीए’च्या पथकाला पाचारण केले होते. या पथकाने सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शोध कार्याला सुरूवात केली होती. मात्र, अंधार पडल्यमुळे सोमवारी रात्री शोध कार्य थांबवले होते. मंगळवारी सकाळी नऊ वाजता पुन्हा शोध कार्याला सुरूवात केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी चारपर्यंत तीनही मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. पारगाव ते वडगाव रासाई दरम्यान चार किलोमीटर परिसरात शोध घेण्यात आला. नदीतील जलपर्णीमुळे शोधकार्यात अडथळे येत हेाते.
शोध संपल्यानंतर पथकातील मदने म्हणाले की, अशा घटनांना आम्हाला सतत सामोरे जावे लागते. मात्र, एकाच कुटुंबातील एवढी मोठी दुर्घटना हाताळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या घटनेत निरपराध चिमुकल्यांचा हकनाक बळी गेला आहे. ही बाब मनाला वेदना देणारी आहे. पारगाव दुर्घटनेतील चिमुकल्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढताना मन हेलावून गेले. चिमुकल्यांना पाहून आमच्या प्रत्येक जवानाने हळहळ व्यक्त केली.
वाघोली अग्निशमन केंद्राचे अधिकारी देवेंद्र पोटफोडे, विभागीय अधिकारी सुजित पाटील, स्टेशन अधिकारी विजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश मदने, ओंकार पाटील, सचिन गवळी, विकास पालवे, अभिजित दराडे, अक्षय नेवसे या जवानांनी शोध कार्यात भाग घेतला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.