Manchar APMC Election : मंचर (ता.आंबेगाव) येथे बुधवारी (ता. २६) महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांच्यावर टीका केली. तसेच लोकांच्या हिताचे काम करण्यासाठी नवीन विचारांच्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचेही वळसे पाटील यावेळी सांगितले.
बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी देवदत्त निकम यांनी जाचक अटी घातल्याचा खुलासा यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी केला. ते म्हणाले, "मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीतून उमेदवारी मागे घ्यावी म्हणून देवदत्त निकम यांच्याबरोबर दोन-तीन वेळा चर्चा केली. त्यावेळी त्यांनी एकतर बाजार समितीचे सभापती म्हणून माझ्या नावाची घोषणा करा किंवा भीमाशंकर कारखाना अध्यक्षपदाचा बाळासाहेब बेंडे यांचा राजीनामा घेऊन अध्यक्ष पदासाठी माझे नाव जाहीर करा. मी बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेतो, अशा अत्यंत जाचक अटी घातल्या. त्या पक्षशिस्तीमध्ये अजिबात बसत नाहीत. आता माझा फोटो लावून फिरत असले तरी निकम यांना माझा पाठिंबा नाही. महाविकास आघाडीच्या अधिकृत १५ उमेदवारांना मोठ्या मताधिकाने विजयी करा."
APMC Election विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपप्रचार सुरू आहे. तसेच पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. वाळसे पाटील म्हणाले, "विधानसभेला दुसरा उमेदवार नको म्हणून भीती वाटायला लागली, असाही अपप्रचार केला जात आहे. मी कधीही भीती बाळगत नाही. मतदार सांगतील तेव्हा थांबायला तयार आहे. आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांनी मोलाची साथ दिली आहे. येथील सहकारी संस्था समाजाच्या मालकीच्या आहेत. लोकांच्या हितासाठी काम करत आहेत. उमेदवारी निश्चित करताना नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरले. निकम व बाळासाहेब बाणखेले यांनी वेगळी भूमिका घेतली. पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात रोष आहे. हा रोष मनात ठेऊनच मतदार पेटीतून बंडखोरी करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवावा."
शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी नाव न घेता निकम यांच्यावर बोचरी टीका केली. देवेंद्र शहा म्हणाले, "१९९० मध्ये दिलीप वळसे पाटील प्रथमच विधानसभा निवडणुकीला उभे राहिले. त्यावेळी अत्यंत प्रतिकूल राजकीय परस्थितीत वळसे पाटील यांना मनापासून साथ देणाऱ्या निवडक कार्यकर्त्यामध्ये मी होतो. उपहासाने मला शेठ म्हणणाऱ्यांना सांगू इच्छितो की माझ वैभव हे आंबेगाव तालुक्याचा विकास व जनता आहे. वळसे पाटील यांना सोडून गेलेल्यांची राजकारणात पुढे काय हाल झाले हे सर्वश्रुत आहे. शरद बँकेचा सुरुवातीला अध्यक्ष झालो. त्यावेळी ९० कोटी रुपये वार्षिक उलाढाल होती. आता तीन हजार २०० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. अनेक उद्योग व्यवसाय उभे राहिले असून तरुणांना रोजगारही मिळाला आहे. याचे भान टीका करणाऱ्यांनी ठेवावे.”
आंबेगाव तालुका (Ambegaon) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे (Vishnu Hinge) म्हणाले, "अनेक नेत्यांनी साखर कारखाने काढले, त्यांनी स्वतःच्या घरात पदे दिली. दिलीप वळसे पाटील यांनी निकम यांना दोन वेळा अध्यक्ष केले. ही वळसे पाटील यांची चूक झाली का? आता त्यांचा साहेबांचा फोटो वापरताना लाज का नाही वाटत? वेगळी चूल मांडणाऱ्या गद्दराला धडा शिकवण्याचे काम मतदारांनी करावे." बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व 15 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास सुरेशभोर व राजू इनामदार यांनी व्यक्त केला. निलेश थोरात, सोमनाथ काळे यांची भाषणे झाली.
यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, काँग्रेस तालुका अध्यक्ष राजू इनामदार, विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, शंकर पिंगळे, रमेश लबडे अरविंद वळसे पाटील, वसंतराव भालेराव, सचिन भोर, सुषमा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.