

PCMC Election : महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १६) पुण्यात जाहीर केले. त्यास दुजोरा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर दोन्ही महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी अजित पवार स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत.
युतीचे चित्र स्पष्ट होताच अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका आयोजित करत पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला आहे. सोमवारी सायंकाळी महापालिकेची निवडणूक जाहीर होताच त्यांनी बारामती गेस्ट हाऊसकडे गाडी वळवली. तेव्हापासून त्यांनी आढावा बैठका घेतल्या, काही पक्षप्रवेश घडवून आणले.
मंगळवारी पुन्हा सकाळी सात वाजल्यापासून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी पवारांनी चर्चा केली. तब्बल 12 तास पक्षीय स्थितीचा आढावा घेतला. पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सुरवातीला प्रत्येक मतदारसंघाला अडीच तासाची वेळ निश्चित केली होती. मात्र भोसरी विधानसभेसाठी 4 तास, पिंपरी विधानसभेसाठी अडीच तास तर चिंचवड विधानसभेसाठी 4 तासांपेक्षा अधिक वेळ दिला.
या दरम्यान प्रभागातील परिस्थिती, इच्छुक उमेदवार, पक्षात येण्यासाठी इच्छुक असलेले आजी-माजी नगरसेवक याचा आढावा घेतला. प्रभागात रणनीती काय असावी याबाबत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. अनेक नवीन उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. त्यांच्याबाबत सर्वेक्षण करून निर्णय कळवू, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आहेत.
ज्या प्रभागात इच्छुकांची संख्या कमी आहे, तिथे बलाढ्य उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. तसेच ज्या प्रभागात अनेक इच्छुक आहेत तिथे सकारात्मक तोडगा काढण्यात येणार आहे. येणाऱ्या चार दिवसांत उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, अशी माहिती पक्षाचे पदाधिकारी देत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या या सक्रियतेमुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.