पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गादरम्यानच्या मावळ (Maval) तालुक्यातील १८२ पैकी १६२ गावात एकही कोरोना (Covid-19) रुग्ण नाही. दुसरीकडे तालुक्यात ८५ टक्के लसीकरण (Vaccination) झाल्याने रुग्णवाढीचा दर हा फक्त दीड टक्क्यावर आला आहे. काल (ता.२ ऑक्टोबर) तालुक्यात फक्त ११ नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यातून मावळची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यात मोठा हातभार आजी आणि माजी आमदारांचा (MLA) आहे. प्रतिस्पर्धी पक्षांतील या दोन्ही नेत्यांनी वैर विसरून श्रेयाविना लसीकरण मोहिमेतील अडथळे दूर करत, लसीकरण मोहीम नेटाने सुरू ठेवल्याने हा सकारात्मक परिणाम बघायला मिळत आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना गेल्यात जमा आहे. आढळणारे नवीन रुग्ण हे शहरी भागातील आहेत. त्यातही तळेगाव, लोणावळा, वडगाव येथे त्यांची संख्या जास्त आहे. सध्या १३४ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यातील सर्वाधिक तळेगाव दाभाडेत याभागातील आहेत. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा टक्का ९७.६ एवढा आहे. काल (ता.२ ऑक्टोबर) नव्याने आढळून आलेल्या ११ रुग्णांतही सर्वाधिक तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील आहेत. तालुक्यातील आतापर्यंतची कोरोना रुग्णसंख्या २७ हजार ३७३ एवढी आहे. त्यातील २६ हजार ७१६ बरे झाले असून ५२३ जणांचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे ,आणि समन्वय अधिकारी डॉ. गुणेश बागडे यांनी सरकारनामाला दिली.
कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा तथा डोस कालपर्यंत १ लाख १२ हजार ८१८ जणांना देण्यात आले आहे. तर, १६ जानेवारीपासून गांधीजयंतीनिमित्त दोन लाख २९ हजार ४८० जणांनी पहिली मात्रा घेतलेली आहे. म्हणजे एकूण ३ लाख ४२ हजार २९८ जणांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान, कमी लसी मिळाल्याने इतर ठिकाणाप्रमाणे मावळातही लसीकरण मोहिमेत अडथळा आला होता. त्यामुळे लसीकरणाला काहीसा ब्रेक लागला होता. त्यावेळी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) व माजी मंत्री बाळा भेगडे (Sanjay Bala Bhegade) यांनी प्रयत्न करून लसींचा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यात लोहारे व डॉ. गुणेश बागडे, यांच्या नियोजनाचा फायदा झाला. त्यातून तीन लाखाच्या लसीकरणाचा टप्पा पार झाला.
दरम्यान, लसीकरण वाढल्याने कोरोना रुग्णसंख्या तालुक्यात झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्याचे श्रेय हेवेदावे बाजूला ठेवणाऱ्या आजी, माजी आमदारांना जात आहे. तालुक्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने करण्यासाठी मोठ्या गावांमध्ये आमदार शेळके यांनी महालसीकरण सुरू केले आहे. ते देहूत आज (ता.३ ऑक्टोबर) झाले. लोकप्रतिनिधींसह शासन, प्रशासनातील सुसंवादामुळे मावळ कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.