आमदार मोहितेंना मोकळं सोडायचं की रोखून धरायचं, हे भाजपवर अवलंबून!

आमदार मोहितेंना ही निवडणूक सोपी दिसत असली तरी भविष्यात पर्याय उभा करण्यासाठी विरोधक एक उमेदवार देऊ शकतात.
Dilip Mohite
Dilip MohiteSarkarnama
Published on
Updated on

राजगुरुनगर (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (pdcc Bank) संचालकपदी खेड तालुक्यातून सोसायटी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) बिनविरोध निवडून येणे हे बहुंशी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर अवलंबून आहे. आमदारांकडे निवडून येण्यासाठी पुरेसे संख्याबळ आहे. पण, त्यांना बिनविरोध करून निवडणूक सोपी होऊ द्यायची नाही. तसेच, आगामी निवडणुकांसाठी आमदारविरोधी ताकद वाढवायची, अशी रणनीती त्यांचे पक्षांतर्गत विरोधक व विरोधी पक्षातील मंडळी आखत आहेत. (Election for the post of Director of Pune District Bank is easy for MLA Dilip Mohite)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी, खेड तालुका विकास सोसायटी गटातून म्हणजेच ‘अ’ गटातून आमदार दिलीप मोहिते, हिरामण सातकर आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. सातकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. या गटातून यापूर्वी आमदार मोहिते यांच्या विरोधात आणि तत्पूर्वी (स्व.) बाळासाहेब शेटे यांच्या विरोधात सातकर यांनी निवडणूक लढविली होती. या वेळीही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज ‘अ’ गटातून दाखल केला आहे. त्याबरोबरच त्यांनी ‘क’ आणि ‘ड’ गटांतूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोनपैकी एका गटात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलमधून उमेदवारी मिळाली, तर ते खेड विकास सोसायटी गटातील आपला अर्ज मागे घेतील. त्यानंतरच आमदारांचा मार्ग सुकर होईल. मात्र त्यांना तेथून संधी मिळाली नाही, तर ‘अ’ गटातून त्यांनी माघार घेण्यासाठी आमदारांना बोलणी करावी लागतील आणि काही तडजोडीही कराव्या लागतील.

Dilip Mohite
विरोधकांनी माघार घेतली; पण भावानेच ठोकला शड्डू!

सातकरांबरोबरच भाजपच्या बुट्टे पाटलांचेही आव्हान आहे. भाजपकडे निवडून येण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. पण, भाजप हा संख्याबळ नसतानाही पक्षवाढीसाठी निवडणूक लढविणारा पक्ष आहे. त्या भूमिकेतून बुट्टे पाटलांची उमेदवारी राहू शकते. तसेच, पक्षाने सर्वांगीण ताकद लावायची ठरविल्यास ते लढतीत रंगत आणू शकतात. लवकरच पक्षाची बैठक होऊन त्याबाबत निर्णय होईल, त्यानंतर आमदारांची निवड बिनविरोध होणार की नाही, हे स्पष्ट होईल.

Dilip Mohite
माजी राज्यमंत्र्यांसह पाच आजी-माजी आमदारांनी प्रयत्न करूनही ‘सिद्धेश्वर’ची निवडणूक लागलीच!

खेड तालुक्यात विकास सोसायटी मतदारसंघातून १०४ प्रतिनिधी मतदार आहेत. आमदार मोहिते हे या गटातून विद्यमान संचालक आहेत. त्यांचे बहुतांश विकास सोसायट्यांवर वर्चस्व असून त्यांच्याच विचारांचे प्रतिनिधी मतदानासाठी निवडले गेले आहेत. तालुक्यातून प्रबळ प्रतिस्पर्धी नसल्याने आमदारांना ही निवडणूक सोपी आहे. पण निवडणूक लागली की मतदार गोळा करावे लागतात. त्यांना राजकीय सहलीवर न्यावे लागते. त्यांचे इतरही खर्च करावे लागतात. सर्व यंत्रणा कामाला लावावी लागते. यामध्ये एक महिना वेळही जातो. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याकडे उमेदवाराचा कल असतो. आमदारही तसा प्रयत्न एका मर्यादेपर्यंत करतील. पण जास्त झुकणे त्यांच्या स्वभावात नसल्याने ते निवडणुकीची तयारी करतील. गेल्यावेळी त्यांनी तशी निवडणूक केली होती.

Dilip Mohite
राष्ट्रवादीतील कलहामुळे एक सदस्य असलेल्या काँग्रेसला मिळाली सत्तेची खुर्ची!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात तालुक्यातील नव्वद टक्के सोसायट्या आहेत. गेल्यावेळी आमदार नसतानाही मोहिते सहज संचालकपदी निवडून आले होते. त्यामुळे यावेळी त्यांना संचालक होणे, ही केवळ औपचारिक बाब राहिली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी सांगितले. एकंदरीत आमदार मोहितेंना ही निवडणूक सोपी दिसत आहे. मात्र, भविष्यातील राजकारणात त्यांना पर्याय उभा करण्यासाठी विरोधक एकास एक उमेदवार देऊ शकतात. तसेच, मोहितेंना बिनविरोध निवडून देऊन राजकारणातील त्यांचे वजन आणखी वाढू नये, यासाठी विरोधक प्रयत्नशील राहतील, असे सध्याचे राजकीय वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com