Pimpri Chinchwad : शास्तीकर रद्दचा जीआर निघण्यापूर्वीच, रद्द झाल्याचे सांगत भाजपचा पिंपरीत जल्लोष!

Pimpri Chinchwad : हा जल्लोष म्हणजे बाजारात तुरी... असा प्रकार असल्याने त्याची शहरात मोठी चर्चा सुरु झाली
Pimpri Chinchwad :
Pimpri Chinchwad : Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरीः पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवर लावण्यात आलेला शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची घोषणा उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल (ता.२१) विधानसभेत केली अन जणू हा कर रद्दच झाल्याच्या थाटात उद्योगनगरीत भाजपने लगेच बुधवारीच (ता.२१) जल्लोष केला.एवढेच नाही तर या ऐतिहासिक निर्णयाव्दारे पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकरातून मुक्ती झाल्याचा दावाही त्यांनी ठोकला.

भाजपबरोबर राज्यात सत्तेत असलेली बाळासाहेबांची शिवसेनाही (शिंदे गट) हा आनंदोत्सव गुरुवारी सायंकाळी करणार होती.परंतू पुण्यातील कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांना तो ऐनवेळी रद्द करावा लागला.

Pimpri Chinchwad :
Ajit Pawar News : अजित पवारांवर आघाडीचे आमदार नाराज? जयंत पाटलांच्या प्रकरणात...

दरम्यान, हा जल्लोष म्हणजे बाजारात तुरी... असा प्रकार असल्याने त्याची शहरात मोठी चर्चा सुरु झाली आहे. कारण शास्तीकर रद्द करणार असल्याची फक्त घोषणा झाली असून तो रद्द झालेला नाही.त्यामुळे विरोधकांनी या जल्लोषावर सडकून टीका केली आहे.तो चुनावी जुमला असल्याचे शहर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सांगितले.

उद्योगनगरीतील अवैध बांधकामाचा म्हणजे शास्तीचाही प्रश्न न्यायालयात असल्याने शास्ती लगेचच रद्द होणे अवघड असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.मात्र, त्यामुळे आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा फायदा होणार असल्याने त्याचे श्रेय भाजपने लगेच घेतले आहे.शास्ती रद्द झाला,तर शहरातील एक लाख घरांना त्याचा फायदा होणार आहे.किमान पन्नास हजार मतदारांना हा निर्णय प्रभावित करणारा ठरणार आहे.

Pimpri Chinchwad :
Mla Santosh Bangar : आता बांगर म्हणाले, खैरेंच्या क्लिपच बाहेर काढतो..

दरम्यान, पूर्ण शास्ती रद्दचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगताच कालच पिंपरीतील भाजप कार्यालयाबाहेर पक्ष पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशा- हलगीच्या तालावर पदाधिकाऱ्यांचा ठेका धरला.जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा केला.तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने लादलेला शास्ती कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीघेतला,असा दावा भाजपचे पिंपरी पालिकेतील माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी यावेळी ठोकला.तर, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभारही मानले.मात्र, शास्तीकर माफीची घोषणा हा चुनावी जुमला आहे, असे शरसंधान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी आज केले.

राज्य सरकार जोपर्यंत यासंदर्भात जीआर काढून शास्तीकर माफीची अंमलबजावणी करत नाही,तोपर्यंत ही घोषणा म्हणजे शहरातील नागरिकांना दाखवलेले गाजर असल्याची टीका त्यांनी केली.ही फसवी घोषणा करून भाजपने यापूर्वीही गुलाल उधळून नागरिकांची दिशाभूल केली आहे, हे लक्षात घेता हा निर्णय म्हणजे महापालिका निवडणुकीचा चुनावी जुमला ठरू नये,अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 15 लाख रुपये खात्यात जमा करण्याचा विषय हा चुनावी जुमला होता असे सांगितले होते तशीच गत शास्ती कर माफी बाबत होऊ नये,असे ते म्हणाले.तसेच ज्यांनी आतापर्यंत गेल्या १४ वर्षातशास्ती कर भरला,त्यांना तो परत देणार का,अशी विचारणाही त्यांनी केली.

तर, फडणवीसांच्या शास्तीसंदर्भातील विधानसभेतील घोषणचा विपर्यास करून 'शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित होणार, आणि शास्ती कर पूर्णपणे माफ होणार' असा अर्थ लावून पिंपरी भाजपने केलेला जल्लोष अनाठायी असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे म्हणाले. फडणवीसांनी शास्ती माफ होईल असे कुठलेही ठोस वक्तव्य केलेले नसून अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत व शास्तीबाबत नवीन योजना जाहीर करण्याचा विचार सरकार करेल" असे सांगितले आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तसेच न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून निर्णय घेतला जातील असे ते म्हणाले असल्याने शास्ती माफ होणार ही एक राजकीय आवई असून केवळ आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शास्ती माफ झाला असून अनधिकृत बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे म्हणणे ही नागरिकांची शुद्ध फसवणूक आहे,असे ते म्हणाले.मागील पंधरा वर्षांपासून पालिका निवडणूक तोंडावर आली की, अनधिकृत बांधकामांसंदर्भात अशा प्रकारची वक्तव्ये त्या त्या वेळच्या सत्ताधारी पक्षांकडून सातत्याने केली जात आहेत,याकडे त्यांनी लक्ष वेधले.

त्यामुळे आताही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा व्हावा यासाठी ही घोषणा केली आहे ,असे सांगत जोपर्यंत संबंधित विषयाचा शासन निर्णय अधिकृतपणे काढला जात नाही, तोपर्यंत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार जर प्रामाणिक असेल, तर त्यांनी तातडीने तसा निर्णय शासन निर्णया जारी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com