राष्ट्रवादीच्या रमेश थोरातांना मोठा धक्का : माजी नगराध्यक्ष, कट्टर समर्थक बादशहा शेख पक्ष सोडणार

बादशहा शेख यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील खदखद सार्वजनिक झाली आहे.
Badshah Shaikh
Badshah ShaikhSarkarnama
Published on
Updated on

दौंड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच राष्ट्रवादीच्या सर्व पदांचे राजीनामे देणार असल्याची माहिती दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना युतीचे गटनेते बादशहा शेख यांनी दिली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बादशहा शेख यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील खदखद सार्वजनिक झाली आहे. शेख यांनी पक्ष सोडल्यास तो राष्ट्रवादीला विशेषतः माजी आमदार रमेश थोरात यांना मोठा धक्का असणार आहे. (Former mayor of Daund Badshah Shaikh decides to resign from NCP)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांचे समर्थक असलेले बादशहा शेख यांनी दौंड शहरात पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मेळाव्यात वस्तुस्थिती मांडल्यानंतर ती न ऐकता पक्षश्रेष्ठींनी मला बोलण्यापासून रोखले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही पक्षश्रेष्ठींनी अपमानास्पद वागणूक दिली. पक्षासाठी वाईटपणा घेतला; परंतु तोच पक्ष आम्हाला विचारत नाही. ज्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना नगरपालिकेच्या दारात तीन तास धरणे आंदोलन करण्यास भाग पाडले, त्यांच्या घरी पक्षश्रेष्ठी भेटी देत असतील तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचे?, असा उद्‌विग्न सवालही शेख यांनी उपस्थित केला. या वागणुकीच्या निषेधार्थ आपण पक्ष सोडणार आहे. परंतु पक्षश्रेष्ठींनी चुका मान्य करीत सन्मानाने वागविले तर निर्णय बदलण्याची आपली तयारी आहे, असेही शेख यांनी सांगितले.

दौंड हे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे व तेथे लोहमार्गावर उड्डाण पूल करण्याऐवजी खर्चाचे कारण पुढे करून दोन मोऱ्या (भूयारी मार्ग) असताना तिसरी मोरी केली जात आहे. दररोज ११० रेल्वेगाड्या त्या लोहमार्गावरून जात असताना उड्डाण पुलाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला; परंतु ज्या बारामती रेल्वे स्थानकात दिवसभरात एकाच गाडीच्या मोजून ०८ फेऱ्या होतात, तेथे मात्र उड्डाण पूल बांधण्यात आला. दौंडला सतत उपेक्षित ठेवण्यात आल्याची खंत बादशहा शेख यांनी व्यक्त केली.

शहराच्या रखडलेल्या विकासाला विरोधकांबरोबर आम्हीदेखील जबाबदार आहोत. राष्ट्रवादी पक्षाने दौंड शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत वगळता फारसे भरीव काम केलेले नाही, अशी कबुलीही शेख यांनी यावेळी बोलताना दिली. बादशहा शेख १९९२ पासून नगरसेवक असून त्यांनी उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष आणि दौंड बाजार समितीचे संचालकपद भूषविले आहे. सध्या ते नगरपालिकेत गटनेते व पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com